Hinjewadi : हिंजवडीसह या सात गावांचा पिंपरी चिंचवड महापालिकेत लवकरच समाविष्ट होण्याची शक्यता ; मुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश…

चिंचवड (प्रतिनिधी): पुणे जिल्ह्यातील मुळशी व मावळ तालुक्यातील सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समावेश करून त्यांचा शाश्वत विकास करण्याच्या मागणीसाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना अधिकृत निवेदन सादर केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीवेळी खासदार श्रीरंग बारणे हेही उपस्थित होते.

या निवेदनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना संबंधित विषयानुसार तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीवर त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले.

हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे (ता. मुळशी), सांगवडे व गहुंजे (ता. मावळ) या सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्यासाठी २०१८ सालीच महापालिकेने ठराव करून शासनाकडे सुधारित प्रस्ताव पाठवला आहे. मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.
