हन्नूरच्या अनंत चैतन्य प्रशालेच्या “माजी विद्यार्थ्यांचा” भरला स्नेहमेळावा—तब्बल ३० वर्षांनी एकमेकांना भेटले ५२ सवंगडी.
—————————————-
“आमदार सचिनदादांचा दिसला साधेपणा,विद्यार्थी बनल्याने व्यक्त झाला मोठेपणा”
माझ्या यशाचे खरे शिल्पकार हे गुरुजन- आ. सचिनदादा कल्याणशेट्टी.
—————————————-
महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्य. व उच्च माध्यमिक प्रशालेच्या दहावीतील सन १९९५-९६ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आज हॉटेल बालाजी सरोवर, सोलापूर येथे अतिशय भव्यदिव्य अशा स्वरूपात , थाटामाटात व आगळ्यावेगळ्या पद्धतीने पार पडला.प्रारंभी आजच्या या स्नेहमेळाव्याकरिता प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थित असलेले प्रशालेचे माजी प्राचार्य व मार्गदर्शक श्री.सिद्धेश्वर कल्याणशेट्टी सरांच्या शुभहस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. पंचप्पा कल्याणशेट्टी सर यांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले. यानंतर या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आमंत्रित असलेल्या सर्व माजी- आजी गुरूजनांचे व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे फेटा,बुके,महर्षि विवेकानंदांची प्रतिमा,कार्यालयीन बॅग, मिठाई देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.यानंतर प्रशालेचे माजी शिक्षक,सोशल कॉलेजचे विद्यमान प्राचार्य डॉ. इक्बाल तांबोळी, माजी मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत व्हनमाने,श्री.बसवराज बंडगर व बापूजी निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अशोक साखरे यांनी आजचा हा स्नेहमेळावा माझ्यासाठी अतिशय भाग्याचा असून मी प्रथमतः शिक्षक म्हणून रुजू झालो त्यावर्षी म्हणजे सन १९९१ साली इ. ६ वीत शिकत असलेल्या तुमच्या बॅचकडून या माझ्यासारख्या सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकाचा सेवानिवृत्तीपुर्वी झालेला सत्कार निश्चितच अविस्मरणीय असे आहे. एवढेच नव्हे तर तुमच्या बॅचमधून सचिनदादा सारखा कमी वयात आकाशाला गवसणी घालणार व्यक्तित्व, अत्यंत विनम्र व संयमी नेतृत्व व विकासाभिमुख कर्तृत्व असलेला नेता अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाकरिता दिला हे अत्यंतअभिमानाची गोष्ट आहे असे सांगून दाखवलेल्या कृतज्ञतेचे कौतुक करून सर्वांचे आभार मानले. यानंतर या माजी विद्यार्थ्यांमधून बॅचची गुणवंत विद्यार्थिनी रुक्मिणी बंदिछोडे, सुनिता बिराजदार यांनी शालेय जीवनातील शिक्षकांच्या योगदानाबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला तर माजी विद्यार्थी सचिन निक्ते,गौरीशंकर भरमशेट्टी, महादेव हेगडे, रणजित देडे यांनी शाळेत असताना घडलेले गमतीदार किस्से, केलेल्या खोड्या, खालेला मार, पालकांची तक्रार ,आलेला अनुभव, एकमेकांना ठेवलेले टोपणनाव आपल्या शब्दातून जसेच्या तसा मांडला. या स्हेनमेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेचे अध्यक्ष व अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आपल्या सध्याच्या व्यस्त जीवनातून, कसल्याही प्रकारच्या मोठेपणाचा आव न आणता या स्नेहमेळाव्यात वेगवेगळ्या शहरातून, खेड्यातून आलेल्या व विभिन्न क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या वर्गर्मित्रांमध्ये ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने गोकुळात आपल्या बालगोपाळात मिसळून वेळ घालवत असे अगदी त्याचप्रमाणे आपल्या मोठेपणाचा लवलेश ही चेहऱ्यावर दिसू न देता स्वभावाप्रमाणे अत्यंत साधेपणाने व विनम्रपणे सगळ्यामध्ये रमून,मिळूनमिसळून संपूर्ण दिवस घालवला व अतिशय काळजीपूर्वक सर्वांची विचारपुस केल्याबद्दल खुप कौतुकाचा व समाधानाचा भाव सर्वांच्याच चेहऱ्यावरुन प्रकर्षाने जाणवत होते. शेवटी आजच्या स्नेहमेळाव्याचे प्रमुख हिस्सेदार, संस्थेचे अध्यक्ष व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी माझ्या यशाचे खरे शिल्पकार हे गुरूजनच आहेत असे सांगून आपली कृतज्ञता व्यक्त केली व आपल्या बाल संवगड्यांना मी सदासर्वकाळ आपल्या सोबत असेन असे आश्वासित केले. विशेष म्हणजे सचिनदादा यांनी मंचावर उपस्थित न होता,आपल्या मित्रांकडून सुद्धा कसल्याही प्रकारच्या सत्काराचा स्वीकार न करता घालवलेल्या क्षणांमुळे सर्वजण खुप भारावून गेले होते. आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुक्मिणी बंदिछोडे हिने व सूत्रसंचालन अपर्णा गव्हाणे मॅडम यांनी तर आभार माजी विद्यार्थी अरुण देडे यांनी मानले.हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी सिद्धाराम आवटे, विठ्ठल पारतनाळे, भिम व्हनमाने,रणजित देडे, इरण्णा मंगरुळे, महादेव हेगडे यांनी खुप परिश्रम घेतले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!