उजनी धरण भरले १०४ टक्के! मुसळधार पावसामुळे उजनीतून दोन महिन्यात सोडले ६३ टीएमसी पाणी; आता भीमा नदीतून सोडला १६०० क्युसेकचा विसर्ग
पाऊसपाणी

उजनी धरण भरले १०४ टक्के! मुसळधार पावसामुळे उजनीतून दोन महिन्यात सोडले ६३ टीएमसी पाणी; आता भीमा नदीतून सोडला १६०० क्युसेकचा विसर्ग

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण सध्या १०४ टक्के भरले असून धरणात दौंडवरून सहा हजार क्युसेकची आवक येत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. १८) उजनी धरणातून भीमा नदीत १६०० क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी सोडले जात आहे.

उजनी भरल्याने उन्हाळ्याची चिंता मिटली आहे. १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने उजनीतून आता भीमा नदीत १६०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. सध्या कालव्यातून ३०० क्युसेक, दहिगाव व सीना-माढा उपसा सिंचन योजनांमधून २६० क्युसेक आणि बोगद्यातून ४०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. दौंडवरून येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास नदीतील विसर्ग वाढू शकतो, असे उजनी धरण पूरनियंत्रण विभागाने स्पष्ट केले आहे.

दोन महिन्यांत सोडले ६३ टीएमसी पाणी

पावसाचा अंदाज घेऊन पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून पहिल्यांदा २० जून रोजी भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. तेव्हापासून १८ ऑगस्टपर्यंत उजनी धरणातून कालवा, बोगदा, उपसा सिंचन योजना व भीमा नदीतून एकूण ६३ टीएमसी पाणी सोडून देण्यात आल्याची माहिती उजनी धरण पूर नियंत्रण विभागाकडून देण्यात आली.
