अक्कलकोट–वागदरी रस्त्याची दयनीय अवस्था : तात्काळ दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
अक्कलकोट ते वागदरी रस्त्यावर झालेल्या पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्यकारी सदस्य प्रवीण घाडगे सांगवी यांनी दिला आहे.
घाडगे म्हणाले की, “तालुक्यात यंदा पाऊस चांगला झाला असला तरी रस्त्यांची मात्र वाट लागली आहे. अक्कलकोट–वागदरी हा रस्ता मराठवाडा, कर्नाटक व आंध्रप्रदेशला जोडणारा प्रमुख मार्ग असून, या रस्त्यावर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र दुर्लक्ष झाल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. नुकताच मंगरुळे पेट्रोल पंपाजवळ मोठा अपघात घडला, हा त्याचाच परिणाम आहे.”
पुढे ते म्हणाले की, “या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेला असून, श्री क्षेत्र अक्कलकोट, जेऊर मार्गे तडवळ व थेट कर्नाटकातील विजापूर जिल्ह्याला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. या प्रक्रियेस वेळ लागेलच, परंतु तोपर्यंत खड्डे बुजवणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर मराठा सेवा संघाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल.”
चौकट
महामार्ग पोलीस व आर.टी.ओ. कडून दुर्लक्ष
या मार्गावर रोज हजारो वाहनांची वर्दळ होत असून, जड वाहतुकीचे प्रमाण अधिक आहे. विशेषतः सिमेंट लगदा वाहतूक करणारे टँकर रस्त्याच्या कडेला उभे केल्याने वाहतूक कोंडी व अपघात वाढले आहेत. वाहतूक नियमांची उघडपणे पायमल्ली होत असतानाही महामार्ग पोलीस व आर.टी.ओ. यांनी याकडे चक्क दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तातडीने कठोर दखल घ्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
– प्रवीण घाडगे
जिल्हा कार्यकारी सदस्य, मराठा सेवा संघ
Back to top button
×
No WhatsApp Number Found!