गावगाथा

वागदरीत सकल मराठा समाजतर्फे बाप-लेकीचा सत्कार

माणसाने एकमेकांच्या सुखदुःखात सामील झालं पाहिजे” — दिनकर जावळे सर

वागदरीत सकल मराठा समाजतर्फे बाप-लेकीचा सत्कार

“माणसाने एकमेकांच्या सुखदुःखात सामील झालं पाहिजे” — दिनकर जावळे सर

वागदरी : सकल मराठा समाज वागदरीतर्फे दिनकर जावळे सरांची नात कु. सृष्टी अजित जावळे हिने बारावी सायन्समध्ये घवघवीत यश मिळवून मुंबईतील एमजीएम कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस. प्रवेश मिळवला तसेच तिचे वडील अजित दिनकर जावळे यांना आयर्न केमिकल्स कंपनीमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर पदावर बढती मिळाल्याबद्दल दोघांचा शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कु. सृष्टीचा सत्कार ज्येष्ठ समाजबंधू भाऊराव पाटील यांच्या हस्ते तर अजित जावळे यांचा सत्कार ट्रस्टचे उपाध्यक्ष तानाजी हेबळे यांच्या हस्ते झाला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी सावंत, सुनील सावंत, श्याम बाबर, स्वामीराव यादव, सुधाकर फुटाणे, गणेश शिंदे, मारुती शिंदे, राज शिंदे, एकनाथ माने, चंद्रकांत कणसे, मनोज सावंत, राम मोरे, लखन मोरे, विशाल सावंत, मनोज शिंदे, धोंडप्पा नंदे, महादेव सोनकवडे, दिनकर जावळे, प्रदीप जावळे, जावळे कुटुंबीय व इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी अनेक समाजबांधवांनी आपले विचार व्यक्त करताना “शिक्षणाशिवाय जीवनात तरणोपाय नाही. शिक्षणामुळे आर्थिक स्थैर्य व सामाजिक प्रतिष्ठा मिळते. आपल्या प्रगतीतून समाजालाही हातभार लावला पाहिजे” असे मत व्यक्त केले.
गुरुवर्य दिनकर जावळे सरांनी आपल्या भाषणात “माणसाने एकमेकांच्या सुखदुःखात सामील झालं पाहिजे. एकोपा आणि आधारामुळे समाजात आर्थिक व सामाजिक सुधारणा घडते, हा आपणा सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे” असे सांगितले. तसेच भाऊराव पाटील घराण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ग्रामदैवत परमेश्वरावरील आपली श्रद्धा अधोरेखित केली.
कु. सृष्टीने सत्काराला उत्तर देताना आपल्या आजी-आजोबा, आई-वडील व समाजबांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तर अजित जावळे यांनी आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आई-वडिलांना देत “मी जो काही आहे तो केवळ माझ्या आई-वडिलांमुळेच आहे” असे सांगून समाजबांधवांच्या प्रेम व आपुलकीबद्दल मन:पूर्वक आभार मानले.
उपस्थित बांधवांच्या उत्स्फूर्त सहभागाने व जावळे घराण्याच्या उत्तम पाहुणचारामुळे हा छोटेखानी पण हृदयस्पर्शी सत्कार समारंभ आनंदात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button