७ वीच्या मुलीचे लग्न थांबवून शिक्षणाची वाट खुली करणाऱ्या दामिनी मार्शलची आणखी एक धडाकेबाज कामगिरी
शिवाजीनगर, पुणे –
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दामिनी मार्शल पथकाने अल्पवयीन मुलीचे लग्न थांबवून तिच्या आयुष्याला नवे वळण दिले आहे.
शिवाजीनगरमधील एका शाळेत सातवीत शिकणारी विद्यार्थिनी आठ–दहा दिवस शाळेत न आल्याने शिक्षकांना संशय आला. चौकशीअंती समजले की तिच्या पालकांचा लवकरच तिचे लग्न लावण्याचा विचार आहे. शिक्षकांनी तातडीने दामिनी मार्शल मपोशी हिंगे यांना माहिती दिली.
मार्शल पथक व महिला शिक्षकांनी मुलीच्या घरी भेट दिली असता समोर आले की, मुलीचे आईवडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात व चार मुलींचा सांभाळ करतात. मुलींचे शिक्षण परवडत नसल्याने नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार त्यांनी मोठ्या मुलीचे शिक्षण थांबवून तिचे लग्न ठरवण्याचा विचार केला होता.
दामिनी मार्शल व शिक्षकांनी पालकांना समजावून सांगितले की, अल्पवयीन मुलीचे लग्न हा कायद्याने गुन्हा असून अशा प्रकारात कारवाई होते. तसेच शिक्षणामुळेच मुलींचे भविष्य बदलू शकते, नाहीतर त्यांचे आयुष्यही मजुरीत जाईल. हे समजावताच मुलगी रडू लागली आणि तिचे भविष्य उद्ध्वस्त होत असल्याची जाणीव वडिलांना झाली. त्यांनीही रडत आपल्या मुलींचे शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
पालकांनी ग्वाही दिली की, “कष्ट कितीही करावे लागले तरी चारही मुलींना शिकवू. नोकरी मिळेपर्यंत मुलींचे लग्न लावणार नाही.”
या संवेदनशील हस्तक्षेपामुळे मुलीच्या शिक्षणाचा मार्ग पुन्हा खुला झाला. पालकांनी दामिनी पथक, पुणे पोलीस, शाळेतील शिक्षक व प्रशासनाचे आभार मानले.
महेश बोळकोटगी
व पोनि, शिवाजीनगर पोलीस ठाणे
Back to top button
×
No WhatsApp Number Found!