गावगाथा

पदवीधर व शिक्षक मतदार संघाकरिता पात्र मतदारांचे मतदार यादीत नाव नोंदणी करा-विभागीय डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पदवीधर मतदार

पदवीधर व शिक्षक मतदार संघाकरिता पात्र मतदारांचे मतदार यादीत नाव नोंदणी करा-विभागीय डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
पुणे, दि. १: पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी – नोव्हो) तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून मतदार नोंदणीची सुरुवात झाली आहे. विभागातील अधिकाधिक पात्र मतदारांचे मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची कार्यवाही करावी, एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीच्या अनुषंगाने सहायक नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी आणि अतिरिक्त पदनिर्देशित अधिकाऱ्यांकरिता आयोजित प्रशिक्षणसत्रात ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त तुषार ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर, निवडणूक तहसीलदार राहूल सांरग आदी उपस्थित होते. तसेच सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी,सहायक मतदार नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी आणि अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणी करतांना प्रचलित कायदे आणि भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे तंतोतत पालन करावे. भारत निवडणूक आयोगाच्यावतीने देण्यात आलेल्या वेळापत्रकाचे पालन करत पारदर्शकपणे काम करावे. मतदार यादीचे काम पारदर्शकपणे करुन यादी बिनचूक तयार करावी. एकगठ्ठा पद्धतीने अर्ज स्विाकारले जाणार नाहीत, अपात्र मतदारांची शिफारस केलेली आढळल्यास निवडणूक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, याबाबत सर्व संबंधितांना बैठक घेवून सूचना द्याव्यात. मतदार नोंदणीकरिता नियुक्त अधिकारी आजारी पडल्यास किंवा अन्य काही अडचणीमुळे रजेवर असल्यास त्याच्या जागी इतर अधिकाऱ्यांची नेमणूक करुन काम थांबणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक मतदार नोंदणीची प्रक्रिया पार पाडतांना समन्वय साधून कामे करावे, अशा सूचना डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या.
श्री. ठोंबरे म्हणाले, सन २०२६ मध्ये होणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाकरिता निवडणुकीसाठी नव्याने मतदार यादी तयार करण्यात येत आहे. त्यामुळे यापूर्वीच्या पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघाच्या मतदारयादीत नाव समाविष्ठ असले तरी आता पात्र मतदारांचे नव्याने मतदार यादीत नाव समाविष्ट करावे, अशा आयोगाचे निर्देश आहेत. मतदार नोंदणी करतांना सर्व कागदपत्रांची तपासणी करुनच नोंदणी करावी. नवीन मतदार नोंदणीचे अर्ज मतदार नोंदणी केंद्रावर पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील, याबाबत दक्षता घ्यावी. मतदारांना मतदार नोंदणी करण्याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन करावे. विभागात ‘स्वीप’ अंतर्गत मतदार नोंदणीबाबचे कार्यक्रम राबवून मतदार नोंदणीबाबत जनजागृती करावी, अशा सूचना श्री. ठोंबरे यांनी दिल्या.
प्रशिक्षण सत्रात मतदार नोंदणीचे टप्पे, मतदार नोंदणीचे अर्ज भरतांना घ्यावाची काळजी, अर्जाची छाननीपक्रिया, मतदार अर्हता, शैक्षणिक कागदपत्रे, मतदार नोंदणी जनजागृती कार्यक्रम, संदर्भ परिपत्रके, शासन निर्णय, आदेश आदी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button