गावगाथा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा समाजबंध दृढ करणारा उपक्रम

सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना ५० लाखांचा जीवनावश्यक धान्य शिधा किट व १ हजार साड्यांचे वाटप – अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांची घोषणा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा समाजबंध दृढ करणारा उपक्रम

सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना ५० लाखांचा जीवनावश्यक धान्य शिधा किट व १ हजार साड्यांचे वाटप – अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांची घोषणा

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे उभ्या राहिलेल्या गंभीर संकटाच्या काळात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांनी समाजासाठी मदतीचा मोठा हात पुढे केला आहे. जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अन्नछत्र मंडळाने सुमारे ५० लाख रुपये मूल्याचे ५ हजार जीवनावश्यक धान्य शिधा किट पूरग्रस्त नागरिकांना देण्याची घोषणा केली आहे.

यासोबतच अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था (संस्थापक अध्यक्षा – अलकाताई जनमेजयराजे भोसले, संस्थापक सचिव – अर्पिताराजे अमोलराजे भोसले) यांच्या माध्यमातून १ हजार पूरग्रस्त महिलांना साडी-चोळीचे वाटप करण्यात येणार आहे. ही माहिती अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी विजयादशमी (दसरा) दिनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस सचिव शामराव मोरे, मनोज निकम व अरविंद शिंदे उपस्थित होते.


मदतकार्याचा ठोस संकल्प

अमोलराजे भोसले म्हणाले,
“पूरग्रस्त नागरिक अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. जिल्हाधिकारी सोलापूर यांनी केलेल्या आवाहनानुसार ५० लाख रुपये मूल्याचे ५ हजार शिधा किट अन्नछत्र मंडळ व हिरकणी संस्थेकडून जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त करण्यात येतील. तसेच १ हजार पूरग्रस्त महिलांना साडी-चोळींचे वाटप करण्यात येणार आहे.”


सातत्यपूर्ण धर्मादाय व सामाजिक कार्य

न्यासाचे सचिव शामराव मोरे म्हणाले,
“श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे गेली ३८ वर्षे स्वामी समर्थ महाराजांच्या अन्नदान परंपरेचे कार्य अखंडितपणे पार पाडत आहे. सामाजिक बांधिलकी जपत हा धर्मादाय न्यास पूरग्रस्त, भूकंपग्रस्त, जळीतग्रस्तांना नेहमीच मदतीचा हात देतो. शासनाच्या विविध उपक्रमांना सहकार्य करण्यासही न्यास सदैव अग्रभागी असतो.”

तसेच हिरकणी संस्था महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आरोग्यविषयक उपक्रम राबवून जनजागृती करते, असे त्यांनी स्पष्ट केले.


चौकट १

अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमीची निर्मिती लवकरच..!

न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली लवकरच “अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमी” उभारण्यात येणार आहे.

अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले हे उत्कृष्ट क्रिकेटपटू व क्रिकेटप्रेमी होते. त्यांच्या सन्मानार्थ सुमारे ५० लाख रुपये खर्च करून ही अकॅडमी अन्नछत्र मंडळाच्या नवीन वाहनतळ जागेत उभारली जाणार आहे. सोलापूरचे प्रख्यात क्रिकेटपटू व प्रशिक्षक सत्यजित जाधव यांचे मार्गदर्शन व सहकार्य या अकॅडमीला लाभणार आहे. हे प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरू होईल, अशी माहिती अमोलराजे भोसले यांनी दिली.


चौकट २

सगळ्यात मोठी घोषणा – पूरग्रस्तांच्या मदतीसाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आघाडीवर..!

सोलापूर जिल्ह्यात पूरपरिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तू देण्याकरिता सर्वांत मोठी मदत जाहीर करणारा धर्मादाय न्यास म्हणून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ठरले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button