गावगाथा

“लेकी आम्ही सावित्रीच्या घडवलेल्या क्रांतीच्या” – खैराट जि.प. शाळेत बालिकादिन उत्साहात साजरा

दिनविशेष

“लेकी आम्ही सावित्रीच्या घडवलेल्या क्रांतीच्या” – खैराट जि.प. शाळेत बालिकादिन उत्साहात साजरा
खैराट : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिकादिन म्हणून जि.प. प्राथमिक मराठी शाळा, खैराट येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इयत्ता सातवीत शिकणारी गौरी गायकवाड होती. यावेळी शाळेतील जवळपास सर्वच मुली सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमात विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी आपल्या भाषणातून माहिती दिली. “आम्ही सावित्रीबाई फुले यांच्या लेकी आहोत. त्यांनी केलेल्या क्रांतीमुळेच आज स्त्रिया मानाने, बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करू शकतात,” असे मत व्यक्त करण्यात आले. घरात आणि समाजात विरोध पत्करूनही सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. अनेक संकटांना सामोरे जात मुलींच्या शिक्षणाचा घेतलेला वसा त्यांनी पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणा व साथीने पूर्ण केला, असेही विद्यार्थिनींनी सांगितले.
मार्गदर्शन करताना सौ. रेखा लक्ष्मण सोनकवडे म्हणाल्या, “पूर्वी स्त्रीला केवळ चूल व मूल यापुरते मर्यादित केले जात होते. मात्र सावित्रीबाई फुले यांच्या अथक प्रयत्नांमुळे सावित्रीची लेक आज सबल बनली असून सर्व क्षेत्रांत ती उजळून निघत आहे. स्त्री हक्काने, कर्तव्याने व जिद्दीने उभी आहे, याचे श्रेय भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनाच जाते.”
यावेळी सुनील होनाजे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. फुले दाम्पत्याने मुलींच्या शिक्षणासाठी अनेक अडथळे पार करून समाजपरिवर्तनाचे कार्य केले. समाजाकडून होणारा त्रास सहन करूनही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले डगमगल्या नाहीत व हाती घेतलेले कार्य त्यांनी पूर्ण केले, असे त्यांनी नमूद केले. बाळूसिंग रजपूत यांनीही आपले विचार मांडले. बालविवाह, केशवपन यांसारख्या अनिष्ट रूढींच्या विरोधात लढा देत स्त्रियांना जगण्याची नवी प्रेरणा देण्यात सावित्रीबाई फुले यांचे योगदान अमूल्य असल्याचे त्यांनी सांगितले. फेरोजा नदाफ यांनीही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती दिली.
बालिकादिनानिमित्त शाळेत विविध स्पर्धा व खेळांचे आयोजन करण्यात आले. खुशी गायकवाड, अक्षता रोडगे, ईश्वरी पाटील, भक्ती जमादार, गौरी गायकवाड, अंकिता घुगरे, रोशनबी बक्षी, रुक्सार बक्षी, सावित्री तोळनुरे, श्रावणी जमादार, मिजबा, विद्याश्री तोळनुरे, अर्पिता जमादार, शिफा पटेल, शिवानी जाधव, गायत्री गायकवाड, स्मिता घुगरे, शिफा बिराजदार, निर्जला फुलारी, संजीवनी तोळनुरे, इकरा मुर्डी आदी विद्यार्थिनींनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश संपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिफा पटेल हिने केले तर आभार प्रदर्शन खुशी गायकवाड हिने केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button