Solapur: ब्रेकिंग; सोलापूरात काॅंग्रेसला मोठा धक्का ; खासदार प्रणिती शिंदेंवर आरोप करत जिल्हाध्यक्षांनी दिला राजीनामा
सोलापूर (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बसलेल्या धक्क्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
सोलापुरात काँग्रेस पक्षापेक्षा सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे हे मोठे झाले असून त्यांच्याकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप धवलसिंह मोहिते पाटील यांनी केला.
विधानसभेत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसला अजून एक धक्का बसला असून सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवला आहे. सोलापूरची काँग्रेस ही शिंदे काँग्रेस झाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत निष्ठावंतांना डावलून तिकीट वाटप केल्याने सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे राजीनामा देत असल्याचे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी पत्राद्वारे पक्षाला कळवले आहे.
विशेष म्हणजे नाना पटोले माळशिरस तालुक्यात येऊनही जिल्हाध्यक्षांची भेट झाली नाही. नाना पटोलेंच्या सोलापूर दौऱ्याच्या दिवशीच धवलसिंह मोहिते पाटील यांनी राजीनामा दिला.
धवलसिंह मोहिते पाटलांचे आरोप काय?
2021 पासून जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून काम केलं. ज्या ठिकाणी सुशीलकुमार शिंदे यांना दहा वर्षे पराभव स्वीकारावा लागला त्या ठिकाणी प्रणिती शिंदे यांना निवडून आणले. प्रणिती शिंदे ज्या ठिकाणच्या आमदार होत्या त्या ठिकाणी त्यांना फक्त 779 लीड मिळालं. पण पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर या तालुक्यांमध्ये सुमारे 66 हजारांचे लीड दिले आणि लोकसभेला निवडून आणले. असं असतानाही विधानसभेला पक्षाने विश्वासात न घेता उमेदवार दिले. त्यामध्ये काँग्रेसला एकही जागा मिलाली नाही.
काँग्रेसचे सभासद नसतानाही आणि तिकीट मागितले नसतानाही भगिरथ भालके यांना तिकीट देण्यात आले. पंढरपूर- मंगळवेढामध्ये प्रामाणिकपणे काम करणार्या कार्यकर्त्यांवर हा अन्याय झाला. सोलापूर दक्षिणमध्ये पक्षाच्या उमेदवाराला डावलून अपक्षाचं काम करण्याचे आदेश सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी दिले. पण त्याचे डिपॉजिटही वाचले नाही.
काँग्रेस पक्ष मोठा की सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे मोठ्या? रक्ताचे पाणी करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर हा प्रश्न पडला आहे. पक्षापेक्षा व्यक्ती मोठी झाली तर त्यासाठी काम करणे कठीण आहे. अशा परिस्थितीत आम्ही काम करू शकणार नाही. भविष्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये शिंदे गट अशाच पद्धतीने काम करणार असून तो प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय करतील. त्यामुळे आपण पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहोत असं धवलसिंह मोहिते पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.