अतिवृष्टीग्रस्तांना आधाराचा हात — करमाळा व परांडा तालुक्यातील शेकडो कुटुंबांना पुणे महापालिका पाणी पुरवठा ठेकेदार संघटनेतर्फे जीवनावश्यक किटचे वाटप
पुणे (प्रतिनिधी) —अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्याने करमाळा व परांडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतातील पिकांचे नुकसान, घरांचे पडझड, पशुधनाची हानी आणि दैनंदिन गरजांची टंचाई यामुळे अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. अशा संकटाच्या काळात समाजातील विविध घटक पुढे येत असताना, पुणे महापालिका पाणी पुरवठा ठेकेदार संघटना या संघटनेने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून एक प्रशंसनीय उपक्रम राबविला आहे.

संघटनेच्या वतीने करमाळा व परांडा तालुक्यातील अंधोरा, बाळेवाडी, मानेवाडी, कोकरेवाडी, पोटेगाव, जवळा आणि परांडा शहरातील सोमवार पेठ दलित वस्ती येथील शेकडो गरजू कुटुंबांना अन्नधान्य, तेल, साखर, डाळ, तांदूळ, साबण, मेणबत्ती, माचिस, पिण्याचे पाणी, ब्लँकेट्स यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी संघटनेतील सदस्यांनी स्वतः पुढाकार घेत गावनिहाय संपर्क साधला, परिस्थितीचा आढावा घेतला आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने योग्य लाभार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचवली. मदत वाटपाच्या वेळी स्थानिक नागरिकांनी भावनिक शब्दांत आभार व्यक्त करत संघटनेच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.

संघटनेच्या वतीने बोलताना पदाधिकारी म्हणाले की, “पाणी पुरवठा क्षेत्रात काम करत असताना आम्ही नेहमी समाजाशी जोडलेले आहोत. आपत्तीच्या काळात समाजाच्या पाठीशी उभे राहणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे. आमच्या सर्व सदस्यांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभाग घेतला.”
या कार्यामुळे ठेकेदार संघटनेने केवळ पुणे महापालिकेच्या चौकटीतच नव्हे, तर ग्रामीण भागातील पूरग्रस्तांच्या मनातही माणुसकीचा दीप प्रज्वलित केला आहे. हा उपक्रम समाजातील इतर संस्थांसाठी प्रेरणादायी ठरावा, अशी स्थानिक ग्रामस्थांची भावना आहे.

अशा प्रकारच्या संवेदनशील उपक्रमामुळे शासकीय यंत्रणेबरोबरच स्वयंसेवी संस्था, संघटना आणि व्यक्तींनीही एकत्र येऊन संकटग्रस्तांना दिलासा देणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Back to top button
×
No WhatsApp Number Found!