श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची पालखी परिक्रमा जतमध्ये दर्शनासाठी दाखल; हजारो भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग
अक्कलकोट प्रतिनिधी :
अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णामाता की जय..!! अशा गगनभेदी जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” सांगली जिल्ह्यातील जतमध्ये दाखल होताच संपूर्ण जत नगरी भक्तिरसाने न्हाऊन निघाली. हजारो भाविकांनी स्वामींचे दर्शन घेत आत्मिक समाधान लाभले.

जत येथील मराठा मंदिर श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पादुका व पालखीचे दर्शनासाठी विशेष व्यवस्थेत ठेवण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मागील २८ वर्षांपासून पालखी परिक्रमेचे आयोजन करण्यात येत असून यंदाचे हे २९ वे वर्ष आहे.
पालखी व पादुकांचे पूजन व आरती हे श्री रामराव विद्यामंदिरचे वरिष्ठ लिपिक नंदकुमार सूर्यवंशी व त्यांच्या सुविद्य पत्नी नम्रता सूर्यवंशी यांच्या हस्ते संपन्न झाले. उपस्थित सर्व भाविकांना पेढे प्रसादाचे वितरण करण्यात आले.
या पवित्र सोहळ्यास संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, खजिनदार लाला राठोड, विश्वस्त भाऊ कापसे, सायबण्णा जाधव, पालखी परिक्रमा मुख्य संयोजक संतोष भोसले, शालेय समिती सदस्य प्रभाकरभाऊ जाधव, अन्नछत्र मंडळाचे सदस्य अरविंद शिंदे, प्राचार्य शिवाजी शिंदे, उपप्राचार्य शिवाजी भांगरे, पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील, संभाजी सरक, परशुराम भोकरे, केंचप्पा तनंगी, अनिता माळी, राहुल भोसले, पांडुरंग साळुंखे, अमोल कळसकर, रुपाली पाटील, मेघा कोपर्डे, वैष्णवी पवार, लायन्स क्लब उपाध्यक्ष चेतन जाधव तसेच अनेक मान्यवर, सेवेकरी, वारकरी व भक्तगण उपस्थित होते.
चौकट : स्वामीभक्तांसाठी घरपोच दर्शनाची संधी
न्यासाच्यावतीने महाराष्ट्रभर तसेच राज्याबाहेरील स्वामीभक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी व पादुकांचे दर्शन व्हावे यासाठी ही परिक्रमा आयोजित करण्यात येते. ज्या वृद्ध, महिला व दूरवरच्या भक्तांना श्री क्षेत्र अक्कलकोट येथे येता येत नाही, त्यांना स्वामीच त्यांच्या गावी येऊन दर्शन देत आहेत, अशी भावना भक्तांमध्ये आहे.
चौकट : अन्नछत्र न्यासाची विविध सेवा
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून अक्कलकोट येथे रोज हजारो भक्तांना महाप्रसाद दिला जातो. तसेच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्यविषयक उपक्रमांसह आपत्तीग्रस्तांना मदत, शासनाच्या उपक्रमांना सहकार्य अशी अनेक सेवा न्यास सातत्याने करीत आहे.
चौकट : भक्तांसाठी भव्य महाप्रसादगृह उभारणी
अन्नछत्र मंडळाच्या जागेत यात्रीनिवास, अतिथी निवास, यात्रिभवन यांसह लवकरच भव्य पाच मजली वातानुकूलित महाप्रसादगृह उभे राहत आहे. १,०९,३९७ चौ.फु. बांधकाम क्षेत्र असलेल्या या इमारतीवर ५१ फुटी स्वामींची उभी मूर्ती हे आकर्षण असेल. एकावेळी २००० भाविक महाप्रसाद घेऊ शकतील तर ५००० भाविक प्रतीक्षेत राहू शकतील. यासाठी अंदाजित खर्च ६५ कोटी रुपये आहे.
न्यास परिसरात सध्या महाप्रसादगृह, गणेश मंदिर, भवानी मंदिर, बालोध्यान, शिवस्मारक, कारंजा, इनडोर-आउटडोर जिम, रुग्णवाहिका, अग्निशमन, राज्य परिवहन कर्मचाऱ्यांसाठी निवास इत्यादी सुविधा कार्यरत आहेत.
चौकट : २०२५-२६ मध्ये ८ महिन्यांची पालखी परिक्रमा
गेल्या २८ वर्षांपासून काढली जाणारी पालखी परिक्रमा कर्नाटकातील बेळगाव, गोवा राज्यातील दोन जिल्हे, तसेच महाराष्ट्रातील ३८ जिल्ह्यांमधून भ्रमंती करणार आहे. यावर्षी मध्यप्रदेश, केरळ, आंध्रप्रदेश, गडचिरोली व परदेशातूनसुद्धा मागणी येत आहे. १५ जुलै २०२५ रोजी पालखी तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे विसावणार असल्याची माहिती कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी दिली.
पालखी परिक्रमेच्या अधिक माहितीसाठी मुख्य संयोजक संतोष भोसले – ९८२२८१०९६६ / ८५५८८५५६७५ यांच्याशी संपर्क साधावा.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!