“परिस्थिती माणसाला घडवत असते; ध्येय निश्चित करून कार्य करा म्हणजे मल्लिनाथ कलशेट्टीसारखे आदर्श निर्माण होतील” — माजी कुलगुरू ईरेश स्वामी
माजी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या ‘मी विकासयात्री’ आत्मचरित्राच्या तिसऱ्या आवृत्तीचे भव्य प्रकाशन सोलापूरमध्ये संपन्न

सोलापूर –“परिस्थिती माणसाला घडवत असते. ध्येय निश्चित करून कार्य केले, तर मल्लिनाथ कलशेट्टी सरांसारखी प्रेरणादायी आदर्श व्यक्तिरेखा घडू शकते,” अशा शब्दात माजी कुलगुरू ईरेश स्वामी सरांनी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या व्यक्तिमत्वाचे सार सांगितले.
सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी लिखित ‘मी विकासयात्री’ या आत्मचरित्राच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन दिमाखात पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू ईरेश स्वामी यांनी भूषविले.
कार्यक्रमाला निवृत्त मुख्य न्यायाधीश प्राची कुलकर्णी, संगमेश्वर महाविद्यालय मॅनेजमेंट सदस्य प्रकाश दर्गोपाटील, प्रकाशक विवेक घोटाळे, प्राचार्य ऋतुराज बुवा, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. आण्णासाहेब साखरे, राजश्री कलशेट्टी व महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले,
“Once NSS, always NSS. एकदा राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी झालो की, आयुष्यभर मनाने NSS चाच विद्यार्थी राहतो. Not me but you — माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठीच काम करण्याचा माझा संकल्प आहे.”त्यांच्या या आत्मचरित्रात त्यांनी केलेल्या विकासकामांचा, सेवाभावाचा आणि सार्वजनिक हितासाठी घेतलेल्या निर्णयांचा प्रवास उत्कटतेने मांडलेला आहे. त्यांच्या कार्यातील पारदर्शकता, जिद्द आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे त्यांनी प्रशासन क्षेत्रात वेगळी छाप निर्माण केली आहे.
कुलगुरू ईरेश स्वामी यांनी आपल्या भाषणात कलशेट्टी यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की,
“अभ्यास, तळमळ, सेवाभाव आणि दक्षता जिथे एकत्र येतात तिथे मल्लिनाथ कलशेट्टीसारखे अधिकारी घडतात. विद्यार्थ्यांनीही परिस्थितीला घाबरू न जाता, ध्येयावर लक्ष केंद्रित केले, तर अशा व्यक्तिमत्त्वांचा आदर्श घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचू शकतात.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केले. ‘मी विकासयात्री’ या आत्मचरित्राच्या तिसऱ्या आवृत्तीमुळे वाचकांना डॉ. कलशेट्टी यांच्या विकासयात्रेतील अनेक नवीन पैलू जाणून घेता येणार आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!