स्व.चंद्रकांत वळसंग यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त वागदरीत शैक्षणिक साहित्य वाटप
वागदरी – श्री एस. एस. शेळके प्रशाला, वागदरी येथे स्व. चंद्रकांत सिद्धप्पा वळसंग यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वही, पेन आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वळसंग यांचे चिरंजीव परशुराम वळसंग व प्रसाद वळसंग यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला.
स्व. चंद्रकांत वळसंग हे शाळेच्या स्थापनेपासून कार्यरत होते. अतिशय नम्र, मनमिळाऊ व हसमुख स्वभावामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये लोकप्रिय होते. आपल्या कामाबद्दल अत्यंत प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि निष्ठावंत अशी त्यांची ख्याती होती.
शेळके प्रशालेचे “चालतं बोलतं विद्यापीठ” म्हणून जेव्हा त्यांचा उल्लेख केला जायचा, तेव्हा तो अतिशयोक्ती नव्हती; कारण शाळेच्या उभारणीत त्यांनी ४० वर्षांहून अधिक काळ मन, श्रम आणि आयुष्य गुंतवले.
त्या महान कार्यकर्त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या मुलांनी आज शाळेत येऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना भावुक वातावरण निर्माण झाले. वळसंग यांच्या स्मृतीला विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी नम्र अभिवादन केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला साधेपणातही एक हृदयस्पर्शी स्वरूप लाभले.
स्व. चंद्रकांत वळसंग यांचे योगदान, त्यांची कार्यनिष्ठा आणि त्यांचे आदर्श पुढील पिढ्यांना निश्चितच प्रेरणा देणारे ठरणार आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!