खैराट येथील जिल्हा परिषद शाळेत परिसर स्वच्छतेतून संत गाडगेबाबांना अभिवादन

अक्कलकोट (प्रतिनिधी) : संत गाडगे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त जि. प. प्राथमिक मराठी शाळा, खैराट येथे शाळा परिसर व रस्त्याची स्वच्छता करून संत गाडगेबाबांच्या कार्यास विनम्र अभिवादन करण्यात आले. हा उपक्रम केंद्रप्रमुख श्रीहरी करपे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी हातात झाडू-खराटा घेऊन शाळा परिसर स्वच्छ केला. स्वच्छतेसोबतच विद्यार्थ्यांना संत गाडगेमहाराजांच्या सामाजिक कार्याची माहिती देण्यात आली. संत गाडगेमहाराजांनी स्वच्छता, शिक्षण व निस्वार्थ सेवेचा संदेश समाजाला दिला. “देव दगडात नाही तर सज्जनात आहे” हा विचार त्यांनी कीर्तनातून समाजापर्यंत पोहोचवला. गावोगावी फिरून स्वतः झाडू घेऊन स्वच्छता करत लोकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य त्यांनी केले.
शिक्षणाचा प्रसार, मूर्तीपूजा, अंधश्रद्धा व व्यसनाधीनतेला विरोध, तसेच गोरगरिब, अंध व अपंगांची सेवा हीच खरी ईश्वरभक्ती असल्याचा संदेश देत रेखा सोनकवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
गाडगेबाबा हे आधुनिक काळातील महान संत असून त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या संतपरंपरेत त्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे, असे बाळूसिंग रजपूत यांनी सांगितले. यावेळी सुनील होनाजे व फिरोजा नदाफ यांनीही स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली.


