Akkalkot election | अक्कलकोट, मैंदर्गीत भाजपा तर दुधनीत अपयश ; दुधनीत शिवसेना शिंदे गटाचे सर्व २१ उमेदवार विजयी

अक्कलकोट (प्रतिनिधी): राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल लागला असून अक्कलकोट तालुक्यातील तीन नगरपरिषदांपैकी दोन नगरपरिषदेवर भाजपाने बाजी मारली आहे. अक्कलकोट मध्ये भाजपाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी , मैंदर्गीत भाजपाचे उमेदवार अंजली बाजारमठ तर दुधनीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रथमेश म्हेत्रे नगराध्यक्षपदासाठी विजयी झाले आहेत.
मात्र संपूर्ण अक्कलकोटकरांचे लक्ष हे दुधनी नगरपरिषदेच्या निकालावर लागून होते, तिथे मात्र भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. दुधनीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रथमेश म्हेत्रे यांच्यासह सर्व २१ उमेदवार विजयी झाले आहेत. तालुक्याचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी हे किंग मेकर म्हणून ओळखले जात असताना देखील दुधनीत भाजपाला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे दुधनीत म्हेत्रे कुटुंबाच्या अस्तित्वाची जी लाढाई होती, ती सार्थ ठरविण्यात प्रथमेश म्हेत्रे यांना यश आलेला आहे.
दरम्यान, अक्कलकोट मध्ये भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा दबदबा कायम असल्याचे पहायला मिळाले . शहरातील २५ जागांपैकी २२ जागांवर भाजपाने विजय मिळवला असून, काॅंग्रेस २, तर शिवसेना शिंदे गटाने १ जागेवर विजय मिळवला आहे.
त्यासोबतच मैंदर्गीत देखील भाजपाने सत्ता पालट करण्यात यशस्वी झाले आहे. मैंदर्गीत अंजली बाजारमठ यांच्यासह भाजपचे १८ उमेदवार विजयी झाले आहेत. एकंदरीतच तालुक्यातील दोन नगरपरिषदेवर भाजपाने सत्ता मिळवली मात्र दुधनीत खाता ही उघडता आला नाही. याची खंत भारतीय जनता पार्टीतून व्यक्त होत आहे.


