गावगाथा

२८ वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा… आठवणी, अश्रू आणि हास्याने फुललेला स्नेहमेळावा…

शंकरराव शरणप्पा आष्टे प्रशाला (आदर्श विद्यालय), भुरिकवठे येथे १९९६ च्या एस.एस.सी. बॅचचा स्नेहमेळावा संपन्न

२८ वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा… आठवणी, अश्रू आणि हास्याने फुललेला स्नेहमेळावा…
भुरिकवठे :शंकरराव शरणप्पा आष्टे प्रशाला (आदर्श विद्यालय), भुरिकवठे येथे १९९६ च्या एस.एस.सी. बॅचचा स्नेहमेळावा म्हणजे तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा भरलेली शाळा असा भावस्पर्शी क्षण ठरला. काळाच्या ओघात वेगवेगळ्या वाटांवर गेलेली मित्रमंडळी पुन्हा एकदा त्याच शाळेच्या अंगणात, त्याच वर्गखोल्यांत एकत्र आली आणि आठवणींच्या गाठी उलगडू लागल्या.
या स्नेहमेळाव्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ शिक्षक मस्के सर यांनी भूषविले. लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक शिरीष खुने, श्रीमती माळगे, श्रीमती आष्टे, विजय आष्टे, सुरेश बिराजदार तसेच उपाध्यक्ष अप्पासाहेब गवसने यांची उपस्थिती कार्यक्रमास लाभली.
माजी मुख्याध्यापक काशेट्टी सर, मस्के सर, शिवगुंडे सर आणि राजकुमार कुलकर्णी सर यांनी मनोगतातून शालेय जीवनातील शिस्त, संस्कार, शिक्षकांचे प्रेम आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील अनुभव कथन केले. त्यांच्या शब्दांनी उपस्थितांच्या मनात शाळेच्या आठवणींचा चित्रफितीसारखा पट उभा राहिला.
१९९६ च्या बॅचमधील स्वामी, आष्टे, कांबळे, बनसोडे, सोलापुरे तसेच इतर माजी विद्यार्थ्यांनी या स्नेहमेळाव्याचे सुयोग्य नियोजन केले. “आज जे काही आहोत, ते या शाळेच्या संस्कारामुळेच,” अशी भावना व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला सीसीटीव्ही कॅमेरा भेट स्वरूपात देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली. त्यानंतर शिवानंद कांबळे व रत्नाकर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने वातावरण अधिकच भावुक झाले. सहशिक्षक शिवानंद ढंगापुरे, अनिता लाटे, मोनेश्वर सुतार, अजित गावसने, प्रशांत गायकवाड, हनुमंत धुळशेट्टी आणि सुहास सोलंकर यांनी मनोगत व्यक्त करून या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास सोलंकर यांनी केले. सौरभ आष्टे, युवराज कुंभार आणि सुनील वडरे यांची उपस्थिती लाभली.
२८ वर्षांनंतर पुन्हा एकदा भरलेली शाळा, जुन्या बाकांवर बसलेली मित्रमंडळी, गुरूंप्रती व्यक्त झालेली कृतज्ञता आणि डोळ्यांत साठलेली भावना — हा स्नेहमेळावा सर्वांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button