अँड. प्रा. सदाशिव माळगे यांना ‘डॉ. कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार’ जाहीर
पुणे : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील आळगे गावचे सुपुत्र, प्राध्यापक, पत्रकार व समाजसेवक अँड. प्रा. सदाशिव माळगे यांची ‘डॉ. कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार – २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ११ व्या पुण्यतिथीनिमित्त ड्रीम फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा या पुरस्काराने गौरव केला जातो.

सध्या पुण्यात कार्यरत असलेले अँड. प्रा. माळगे हे शिक्षण, पत्रकारिता आणि समाजसेवा या क्षेत्रांत गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, विविध सामाजिक उपक्रम, गरजूंना वैद्यकीय मदत तसेच समाजहिताच्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांनी सातत्याने सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या या बहुआयामी व समाजाभिमुख कार्याची दखल घेत निवड समितीने त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन सोमवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स सभागृह, हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट, पुणे येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ वैज्ञानिक तसेच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत कार्य केलेले डॉ. अशोक जी. नगरकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. ही माहिती ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व संयोजक काशिनाथ भतगुणकी यांनी दिली.
अँड. प्रा. सदाशिव माळगे यांना ‘डॉ. कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल शैक्षणिक, पत्रकारिता, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!