गावगाथा

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वळसंगमध्ये हालचालींना वेग; कै. शिवलिंगप्पा कोडले यांच्या पुण्यस्मरणातून मलकप्पा कोडले यांची उमेदवारी चर्चेत

जिल्हा परिषद रणधुमाळी

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वळसंगमध्ये हालचालींना वेग; कै. शिवलिंगप्पा कोडले यांच्या पुण्यस्मरणातून मलकप्पा कोडले यांची उमेदवारी चर्चेत
वळसंग (प्रतिनिधी):जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राज्यभरात वातावरण तापू लागले असून विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राजकीय शक्तिप्रदर्शनाला वेग आला आहे. लग्न, वाढदिवस, जत्रा, उरूस, जयंती, पुण्यतिथी अशा कार्यक्रमांतून राजकीय उपस्थिती ठळकपणे दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर वळसंग येथील लोकनेते कै. शिवलिंगप्पा कोडले मामा यांचे तृतीय पुण्यस्मरण दिनांक १२ जानेवारी रोजी सिद्धेश्वर स्वामी मंदिर, वळसंग येथे आयोजित करण्यात आले आहे.
कै. शिवलिंगप्पा कोडले यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत वळसंग गावच्या विकासाचा मजबूत पाया रचला. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री आनंदराव देवकते यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात. लोकसभा, विधानसभा, मार्केट कमिटी, सिद्धेश्वर साखर कारखाना, जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा सर्व निवडणूक प्रक्रियांमध्ये वळसंग भागात कोडले मामा यांच्या शब्दाला मोठे महत्त्व होते. निवडणूक काळात “कोडले म्हणतील तीच पूर्व दिशा” अशी परिस्थिती त्यांच्या कार्यकाळात होती.

याच परंपरेत त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र मलकप्पा कोडले सध्या जिल्हा परिषद निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. मलकप्पा कोडले हे सध्या वळसंग ग्रामपंचायतीचे सदस्य असून त्यांनी प्रदीर्घ काळ कोणतेही पद न भूषवता समाजसेवेचे कार्य केले आहे. वडील शिवलिंगप्पा कोडले यांच्या १५ वर्षांच्या सरपंच कारकिर्दीत तसेच काका सिद्धाराम कोडले यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी समाजसेवेबरोबरच राजकारणाचे धडे गिरवले.
दक्षिण सोलापूर तालुक्यात विकास आघाडीचे वारे वाहत असतानाही लोकनेते कोडले मामा यांनी वळसंग जिल्हा परिषद मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत विजयश्री खेचून आणली होती. त्याचबरोबर मलकप्पा कोडले यांच्या मातोश्री महानंदा कोडले यांनीही वळसंग पंचायत समितीवर यशस्वी नेतृत्व केले होते. या दोघांच्या कारकिर्दीत पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा कारभार मलकप्पा कोडले यांनी जवळून पाहिला व अनुभवला आहे.
या पार्श्वभूमीवर मलकप्पा कोडले यांना निवडणुकांचा भक्कम अनुभव असून, त्यांना जिल्हा परिषदेची संधी मिळाल्यास ते सक्षम व लोकाभिमुख कारभार करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. वळसंग व परिसरातील युवा वर्ग, शेतकरी, व्यापारी यांच्याकडून त्यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी होत आहे.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनानुसार मलकप्पा कोडले यांनी यापूर्वी मार्केट कमिटी निवडणुकीतून माघार घेतली होती. सध्या ते आमदार कल्याणशेट्टी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात असल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. वळसंगच्या राजकारणात कोडले कुटुंबाची परंपरा आणि जनसामान्यांतील विश्वास पाहता, येत्या काळात ही उमेदवारी निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button