जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले; वागदरी गटात दुरंगी की तिरंगी लढत याकडे सर्वांचे लक्ष..?
वागदरी / प्रतिनिधी :
बहुचर्चित जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजताच वागदरी परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. निवडणूक आरक्षण जाहीर होताच वागदरी जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तयारीला वेग दिल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या मतदारसंघात नेमकी कोणाची बाजी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
वागदरी जिल्हा परिषद गट हा नेहमीच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा व चुरशीचा मानला जातो. यंदा इच्छुकांचीही संख्या वाढली आहे. परिणामी याठिकाणी दुरंगी लढत होणार की तिरंगी, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय जनता पार्टीकडून या गटासाठी विद्यमान माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे हे पुन्हा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. जनसंपर्क, अनुभव आणि संघटनात्मक बांधणी ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. तसेच वागदरीतील युवानेते, शेळके प्रशालेचे चेअरमन बसवराज शेळके हे देखील इच्छुक असून ते आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे भाजप नव्या चेहऱ्याला संधी देणार की जुन्या निष्ठावंतावर विश्वास ठेवणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
शिवसेना (शिंदे गट) कडून वागदरीचे सरपंच शिवानंद घोळसगांव हे इच्छुक असल्याची जोरदार चर्चा सुरू असून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर काँग्रेसकडून सध्या कोणत्याही ठोस उमेदवाराचे नाव समोर आलेले नसले तरी ऐन वेळी सक्षम व प्रभावी उमेदवार देऊन राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, स्थानिक राजकारणात हालचालींना वेग आला असून ग्रामपातळीवर कार्यरत सामाजिक कार्यकर्ते, माजी पदाधिकारी तसेच नवोदित चेहरेही निवडणूक मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मतदारांसमोर यंदा अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. प्रचारात विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य व रोजगार हे मुद्दे केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.
एकूणच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वागदरी गटात राजकीय वातावरण ढवळून निघाले असून दुरंगी की तिरंगी लढत, कोणता पक्ष सरशी साधणार आणि मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने जाणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही लढत आणखी रंगतदार होणार, हे मात्र निश्चित आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!