गावगाथा

डॉक्टर गैरहजर, कर्मचारी बेफिकीर; वागदरी आरोग्य केंद्रातील कारभारावर प्रश्नचिन्ह

आरोग्य विभाग

डॉक्टर गैरहजर, कर्मचारी बेफिकीर; वागदरी आरोग्य केंद्रातील कारभारावर प्रश्नचिन्ह
वागदरी (ता. अक्कलकोट) प्रतिनिधी :
वागदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सध्या पूर्णपणे ढासळलेला असून रुग्णसेवेऐवजी गैरकारभार आणि दुर्लक्षाचे चित्र दिसत आहे. रात्रीच्या वेळी आरोग्य केंद्रात एक-दोन कर्मचारी वगळता कोणीही हजर नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते श्याम बाबर यांनी जिल्हा परिषद सोलापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
शासनाने आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सुसज्ज निवासस्थाने उभारली आहेत. मात्र ही निवासस्थाने वापरात नसून त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी जनावरांचा वावर वाढला असून कोट्यवधींची शासकीय मालमत्ता नियोजनाअभावी पडून असल्याचे दिसून येत आहे. डॉक्टर व कर्मचारी मुख्यालयी राहण्यास तयार नसल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तक्रारीनुसार काही कर्मचारी वेळेवर हजर राहत नाहीत, तर काही जण अनधिकृतपणे गैरहजर राहून शासकीय कर्तव्यात कसूर करत आहेत. रुग्णांशी एकेरी भाषेत बोलणे, उपचारांसाठी टाळाटाळ करणे अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अनेकदा तक्रारी करूनही वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
गोरगरीब रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात उपचार मोफत असताना वागदरी आरोग्य केंद्रात मात्र वेगळेच चित्र दिसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रसुती व कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांकडून प्रत्येकी सुमारे २०० रुपयांची बेकायदेशीर वसुली केली जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते श्याम बाबर म्हणाले की, “वागदरी प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या भ्रष्टाचार आणि गैरकारभाराचे केंद्र बनले आहे. गोरगरीब रुग्णांची उघड आर्थिक लूट होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे यांनी सांगितले की, “मुख्यालयी न राहणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याबाबतचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार जिल्हा आरोग्य अधिकारी यांना असून त्याबाबतचा निर्णय त्यांच्या स्तरावर प्रलंबित आहे.”
एकूणच वागदरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील बेजबाबदार कारभारामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांचे हाल होत असून या प्रकरणात प्रशासनाने तात्काळ लक्ष घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button