गावगाथा

वागदरी येथे श्री परमेश्वर यात्रेनिमित्त लहान रथाचे पंच कमिटीतर्फे लोकार्पण

धार्मिक कार्यक्रम

वागदरी येथे श्री परमेश्वर यात्रेनिमित्त लहान रथाचे पंच कमिटीतर्फे लोकार्पण
वागदरी (ता. अक्कलकोट) — अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील जागृत व नवसाला पावणारे ग्रामदैवत श्री परमेश्वर यांच्या यात्रेनिमित्त उचई पंच कमिटी व वमने समाज यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या स्टीलच्या लहान उचई (रथ) चे लोकार्पण ५ मार्च रोजी भक्तीमय व उत्साही वातावरणात संपन्न झाले. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर दिनांक ४ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता कलेणी वमने यांच्या घरातून उचई कळस, पार्वती मूर्ती व बसवण्णा मूर्ती यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक गावातील प्रमुख मार्गांवरून श्री परमेश्वर मंदिरापर्यंत मोठ्या उत्साहात पार पडली. या मिरवणुकीत ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

त्यानंतर ५ मार्च रोजी पहाटे श्री परमेश्वर व पार्वती मूर्ती तसेच कळसाला महा रुद्राभिषेक करण्यात आला. यावेळी आळंद शरणमठाचे चन्नवीर महास्वामी तसेच मैंदर्गी येथील अभिनव पटदेवरू यांच्या दिव्य सानिध्यात नवग्रह पूजा, पंचकळस पूजा, रुद्र पूजा, होम-हवन व परमेश्वर–पार्वती अभिषेक असे विविध धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर लहान उचई (रथ) चे विधिवत लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमात उचई तयार करणारे मादन हिप्परगा येथील कलाकार गौतम गायकवाड यांचा सहपत्नी सत्कार करण्यात आला. तसेच पंच कमिटीतील ज्येष्ठ सदस्य मल्लाप्पा निरोळी, सिद्धारूढ नंदर्गी, शांताबाई नंदर्गी, माणिक नीलगार, शरणाबाई वमने, शिवमूर्ती बटगेरी व कलेणी वमने यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यानंतर महास्वामीजींचे दर्शन, सुवासिनींचा मंगल कार्यक्रम तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उचई पंच कमिटीचे बसवंतराव वळसंग, बसवराज नडगेरी, शिवानंद ढोपरे, मुत्तन्ना दुधगी, परमेश्वर कोणजी, कलेणी वमने, धानप्पा वमने व गुरुनाथ वमने यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button