सोलापूर गड्डा यात्रा विशेष

हजारोंच्या साक्षीने सोलापूरात श्री सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा संपन्न !

सोलापुरात लक्ष लक्ष नयनांनी पाहिला अक्षता सोहळा ; सिद्धेश्वर मंदिर परिसर भक्तिरसात चिंब ;

हजारोंच्या साक्षीने सोलापूरात श्री सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा संपन्न !
सोलापुरात लक्ष लक्ष नयनांनी पाहिला अक्षता सोहळा ; सिद्धेश्वर मंदिर परिसर भक्तिरसात चिंब ;

सोलापूर – ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरातील संमती कट्ट्याजवळ ९०० वर्षांची परंपरा असलेला नंदीध्वजांचा अनुपम अक्षता सोहळा शनिवारी दुपारी लक्षावधी भाविकांनी अनुभवला. ओम सिद्धरामा नम:… दिड्ड्यम् दिड्ड्यम्… सत्यम् सत्यम्… नित्यम् नित्यम् या मंत्रोच्चारासह मंगलाष्टक सुरू झाले अन् लाखो भाविकांनी सिद्धेश्वरांच्या नंदीध्वजांवर तांदळाच्या अक्षतांचा वर्षाव केला. अपूर्व उत्साह आणि शिस्तीचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यास दुपारी २.०५ वाजता सुरुवात झाली. एकदा भक्तलिंग बोला… हर्र… बोला हर्र..चा गजर आणि सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष होत होता. कोरोना महामारी मुळे सलग दोन वर्षे भक्तांच्या अनुपस्थितीत झालेल्या अक्षता सोहळ्याला यंदा लाखों भक्तांची मांदियाळी होती.
शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या सातही मानाच्या काठ्या (नंदीध्वज) संमती कट्ट्याजवळ दुपारी सव्वा एक वाजता दाखल झाल्या. पंचाचार्यांचा समता ध्वज, पालखी होती. नाशिक ढोल या मिरवणुकीत होता. सात काठ्या विविधरंगी फुलांनी सजवल्या होत्या. मानाच्या पहिल्या काठीला सुंदर बाशिंग बांधलेले होते. सवाद्य मिरवणुकीत मोठ्या उत्साहात मंदिर परिसरातील संमती कट्ट्यालगत सात काठ्या आल्या. पांढरे बाराबंदी, धोतर, डोईवर पांढरा फेटा, कपाळाला गंध अशा पेहरावात लाखाे भाविकांमुळे सोहळ्यात उत्साह, भक्ती आणि शिस्तीचे दर्शन घडले.

सुहास शेटे यांनी संमती वाचनाला प्रारंभ केला. दिड्ड्यम् दिड्यम्, सत्यम् सत्यम् मंत्रोच्चारात पाच अक्षता टाकण्यात आल्या. सव्वादोन वाजता अक्षता सोहळा पूर्ण झाला. उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने सिद्धरामेश्वरांचा जयजयकार केला. यानंतर दर्शनाकरता रांगा लागल्या. भाविकांनी एकमेकांना मकर संक्रातच्या शुभेच्छा दिल्या. वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांनी कन्नड, इंग्रजी, मराठी अशा विविध भाषेतून सिद्धरामेश्वरांचा जयजयकार करत सूत्रसंचालन केले.

मान्यवरांची उपस्थिती

यंदायात्रेसाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, महापालिका आयुक्त शीतल तेली, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे पत्नी उज्ज्वलाताई, नातू शिखर पहारिया, बारामती वरून उपस्थित राहिलेले राजेंद्र पवार यांच्यासह उपस्थित होते. याच गॅलरीत अक्कलकोटचे मालोजीराजे उपस्थित होते. माजी आमदार दिलीप माने, संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, अमोल शिंदे, शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, आनंद चंदनशिवे, सोमनाथ केंगनाळकर यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी,आमदार समाधान आवताडे, आमदार राजेंद्र राऊत, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार रविकांत पाटील, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, हरीश पाटील, माजी आमदार शिवशरण पाटील, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, मनोहर सपाटे, सुदीप चाकोते सर्वसामान्यांप्रमाणे संमती कट्याजवळ होते.

थेट प्रक्षेपण आणि स्क्रीनची सुविधा

अक्षता सोहळ्याच्या वेळी लाखो भाविकांसाठी स्थानिक वाहिन्यांनी अक्षता सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले. संमती कट्ट्याजवळ मोठ्या स्क्रीनची व्यवस्था होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button