गावगाथा

*उत्तम सदाकाळ यांना “आनंदाचं झाड” बालसाहित्य पुरस्कार प्रदान*

पुरस्कार

*उत्तम सदाकाळ यांना “आनंदाचं झाड” बालसाहित्य पुरस्कार प्रदान*
परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात उपक्रमशीलतेने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘आनंदाचं झाड’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडीच्या वतीने दिला जाणारा मानाचा व अत्यंत प्रतिष्ठेचा आनंदाचं झाड बालसाहित्य ग्रंथ कृतज्ञता पुरस्कार” प्रसिद्ध साहित्यिक उत्तम सदाकाळ यांना शाळेतील मुलांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे या पुरस्काराची निवड शाळेतील मुलांनीच केली. राज्यभरातून आलेल्या अनेक पुस्तकातून उत्तम सदाकाळ यांच्या ‘बोळातले भूत’ या पुस्तकाची निवड मुलांच्या निवड समितीने केली. पुरस्कार समारंभाचे संपूर्ण नियोजन मुलांनीच केले व कार्यक्रम यशस्वी केला.
या प्रसंगी विद्यार्थी व उपक्रमशील शिक्षक युवराज माने यांनी पुढील भावना व्यक्त केल्या.
माणसं भेटतात… आणि शब्दांना जीव मिळतो…
मुलं लेखन वाचतात… त्यांचं बालमन हसतं, विचार करतं, उंच भरारी घ्यायला शिकतं…
उत्तम सदाकाळ लेकरांच्या आनंदासाठी लिहिणारा, त्यांच्या कृतीला मनापासून सलाम करणारा एक जिवंत शब्दकार… त्यांच्या ‘बोळातलं भूत’ या सुंदर कथासंग्रहाला आमच्या लेकरांनी
‘आनंदाचं झाड बालसाहित्य ग्रंथ कृतज्ञता पुरस्कार’ देऊन सन्मानित केलं…हा फक्त पुरस्कार नव्हता… तर बालमनातून उमटलेलं कृतज्ञतेचं खरं भावविश्व होतं… त्यांचं स्वागतही लेकरांनी अगदी मनापासून केलं…फुलांपेक्षा सुंदर होती त्यांची निरागस स्मितं…
यानंतर रंगल्या भरपूर गप्पा, गोष्टी, हशा आणि विचारांची देवाणघेवाण…
शाळेतील कु. ईश्वरी राठोड हिने घेतलेली उत्तम सदाकाळ यांची मुलाखत तर खूपच खास ठरली…
लेकरांच्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी ज्या आत्मीयतेने उत्तर दिलं,त्यातून लेखक आणि वाचक यांच्यातील नातं अजून घट्ट झालं… लेकरांच्या कुतूहलाला त्यांनी दिलेली उत्तम दाद,त्यांच्या डोळ्यातील चमक आणि चेहऱ्यावरचं समाधान यातूनच या भेटीचं खरं सार्थक झालं…
अशा भेटी म्हणजे फक्त कार्यक्रम नसतात…
त्या प्रेरणेच्या नव्या वाटा उघडणाऱ्या,बालमनात स्वप्नांची बीजं पेरणाऱ्या असतात… ‘आनंदाचं झाड’ असंच फुलत राहो…आणि अशा सुंदर माणसांच्या सहवासाने अधिक समृद्ध होत राहो…
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रल्हाद काणेकर (संचालक, शारदा विद्यालय, सेलू) होते. प्रमुख अतिथी म्हणून नितीन लोहाट (संचालक, जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय, परभणी), मा. उदय जाधव (गटविकास अधिकारी), अनिल शंकर राठोड (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, पारडी), विठ्ठलराव राठोड (तंटामुक्ती अध्यक्ष), साहेबराव राठोड (माजी पोलीस पाटील), डी. डी. रोकडे (केंद्रप्रमुख, वालुर), अनिल राठोड (उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती) व शिवाजीराव लंघे (माजी उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती) उपस्थित होते.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक डी. के. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रास्ताविक युवराज माने यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश आकलोड यांनी मानले.
या सन्मान सोहळ्यामुळे साहित्यिक उत्तम सदाकाळ यांचे समाजाच्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button