गावगाथा

मुख्याध्यापक बाबासाहेब बनसोडे यांच्या दातृत्वातून जिल्हा परिषद शाळेला भव्य गेट; शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारूती शिंदे यांच्या पुढाकाराला यश..

शैक्षणिक बातमी

मुख्याध्यापक बाबासाहेब बनसोडे यांच्या दातृत्वातून जिल्हा परिषद शाळेला भव्य गेट; शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारूती शिंदे यांच्या पुढाकाराला यश..

 

HTML img Tag Simply Easy Learning    
वागदरी : जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या विकासासाठी मुख्याध्यापक श्री. बाबासाहेब बनसोडे यांनी दाखविलेल्या दातृत्वासह शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणप्रेमी अध्यक्ष श्री. मारूती शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पुढाकारामुळे शाळेला भव्य लोखंडी प्रवेशद्वार उभारण्याचे स्वप्न साकार झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शाळेला संरक्षक गेट नसल्याने परिसरातील साहित्याची नासधूस होत होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मारूती शिंदे यांनी गेट उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पुढाकाराला प्रतिसाद देत मुख्याध्यापक श्री. बाबासाहेब बनसोडे यांनी स्वतःच्या खिशातून ३५ हजार रुपये देणगी दिली, तर शाळेतील सहकारी शिक्षकांनी १० हजार रुपये लोकवर्गणीतून दिले. अशा प्रकारे एकूण ४५ हजार रुपयांच्या निधीतून शाळेसाठी आकर्षक व मजबूत लोखंडी गेट उभारण्यात आले.
या उपक्रमामुळे शाळेची सुरक्षा वाढण्याबरोबरच परिसराच्या सौंदर्यातही भर पडली आहे. मुख्याध्यापक श्री. बाबासाहेब बनसोडे यांचे दातृत्व आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मारूती शिंदे यांचा विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला असून ग्रामस्थांकडून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिक्षक हे केवळ ज्ञानदान करणारे नसून समाजघडणीचे शिल्पकार असतात, याची प्रचिती श्री. बाबासाहेब बनसोडे यांनी दिली आहे. त्याचबरोबर शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे अध्यक्ष श्री. मारूती शिंदे यांनीही लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
यावेळी ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले की, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी आणि विविध स्तरांवरील सहकार्यामुळे शाळेच्या विकासाची वाटचाल सुरू असली, तरी अजूनही अनेक मूलभूत सुविधांची आवश्यकता आहे. त्यामुळे गावातील सर्व नागरिक, माजी विद्यार्थी, दानशूर व्यक्ती आणि शिक्षणप्रेमींनी लोकसहभागातून शाळेला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढे यावे.
शाळेला भव्य प्रवेशद्वार उभारण्यासाठी मोलाचे योगदान देणारे मुख्याध्यापक श्री. बाबासाहेब बनसोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मारूती शिंदे, सर्व सहकारी शिक्षक तसेच या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे ग्रामस्थांनी मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button