*श्री महालिंगरायांचा दिव्य वारसा ; गुरु-शिष्यांच्या अद्भुत संगमाचे चित्रपट अंतिम टप्प्यात….*

*लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार भव्य ऐतिहासिक-आध्यात्मिक चित्रपट*
पुणे विशेष प्रतिनिधी
धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री महालिंगराय यांच्या दिव्य जीवनकार्याचा, त्यांच्या अध्यात्मिक परंपरेचा आणि गुरु श्री बिरलिंगेश्वर यांच्याशी असलेल्या अद्वितीय गुरु-शिष्य नात्याचा गौरवशाली इतिहास मोठ्या पडद्यावर साकारला जात असून या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे चित्रीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे. चित्रपट निर्माते व अभ्यासक शिवराम मल्लप्पा आसापुरे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

श्री महालिंगराय आणि श्री बिरलिंगेश्वर यांच्यातील अतूट श्रद्धा, निस्सीम भक्ती, त्याग, सत्यनिष्ठा आणि अध्यात्मिक सामर्थ्य यांचे प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. इतिहास, लोकपरंपरा आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडवत हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जतन करण्याचे कार्य करणार आहे.

चित्रपटाच्या माध्यमातून हलुमता धर्माची महान परंपरा, धनगर समाजाची सांस्कृतिक ओळख, तसेच श्री महालिंगराय यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भव्य सेट, नयनरम्य लोकेशन्स, ऐतिहासिक वेशभूषा आणि वास्तवदर्शी कथानक यामुळे चित्रपटाला विशेष आकर्षण प्राप्त झाले आहे.
चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची निवड करण्यात आली असून अनेक कलाकार, तंत्रज्ञ आणि अभ्यासकांनी या प्रकल्पात योगदान दिले आहे. श्री महालिंगराय यांच्या जीवनातील शौर्य, भक्ती आणि समाजहिताच्या कार्याचे प्रभावी दर्शन या चित्रपटातून घडणार आहे.

निर्माते शिवराम मल्लप्पा आसापुरे यांनी सांगितले की, “हा चित्रपट केवळ कलाकृती नसून आपल्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा जागतिक परिचय करून देणारा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. गुरु-शिष्य परंपरेतील श्रद्धा, समर्पण आणि आध्यात्मिक शक्तीचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
सध्या चित्रपटाचे चित्रीकरण आणि पोस्ट-प्रॉडक्शनची कामे अंतिम टप्प्यात असून लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. धनगर समाजासह अध्यात्म, इतिहास आणि संस्कृतीची आवड असलेल्या प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
गुरु-शिष्यांच्या पवित्र नात्याचा, श्रद्धा आणि सत्याच्या विजयाचा संदेश देणारा “श्री महालिंगराय” चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार असून भारतीय अध्यात्मिक वारशाचा गौरवशाली अध्याय जगासमोर मांडणार आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!