मोरवी हाउस येथील साखर संघाचे अतिथीगृह तात्काळ सुरू करण्याची मागणी
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक परिसरातील गोवा स्ट्रीट, सुंदरलाल बहल मार्गावरील पोलीस वसाहतीसमोरील महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे मोरवी हाउस येथील अतिथीगृह त्वरित सुरू करण्याची मागणी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांकडून होत आहे.

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या काळात महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघामार्फत हे अतिथीगृह सुरू करण्यात आले होते. राज्याच्या विविध भागांतून मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या साखर कारखान्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय व्हावी या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. अनेक वर्षे या अतिथीगृहामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी सोय होत होती.
मात्र अलीकडील काळात तोट्यात चालू असल्याचे कारण देत हे अतिथीगृह एका खाजगी ठेकेदाराकडे चालवण्यासाठी देण्यात आले. काही काळ चालवल्यानंतर सध्या अनेक महिन्यांपासून हे अतिथीगृह बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईत कारखान्याच्या कामानिमित्त येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच अतिथीगृह बंद असल्यामुळे साखर संघालाही आर्थिक नुकसान होत असल्याची चर्चा आहे.
याबाबत साखर संघाने बघ्याची भूमिका न घेता मोरवी हाउस येथील अतिथीगृह तात्काळ सुरू करावे, अशी मागणी राज्यातील सहकारी साखर कारखाना अधिकारी व कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे. अन्यथा या प्रश्नावर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या संदर्भात राज्याचे सहकार मंत्री, सहकार विभागाचे सचिव, आयुक्त तसेच साखर संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ आणि राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष यांनी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही पुढे येत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!