गावगाथा

चपळगावचे श्री मल्लिकार्जुन मंदिर यात्रा विशेष : इतिहास, श्रद्धा आणि परंपरेचे अनमोल लेणे

यात्रा उत्सव विशेष २०२६

चपळगावचे श्री मल्लिकार्जुन मंदिर यात्रा विशेष : इतिहास, श्रद्धा आणि परंपरेचे अनमोल लेणे…..

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट तालुक्यातील प्राचीन धार्मिक स्थळांमध्ये मानाचे स्थान असलेले चपळगाव येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महाराजांचे मंदिर हे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील भव्य आणि ऐतिहासिक मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. अक्कलकोट शहराच्या उत्तरेस सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या चपळगावची ओळखच या प्राचीन व जागृत देवस्थानामुळे आहे. संपूर्ण दगडी बांधकाम, नक्षीदार कोरीव काम, विस्तीर्ण रचना आणि भव्य दगडी मंडप यामुळे या मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.
या मंदिराबाबत एक पवित्र आख्यायिका सांगितली जाते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्रीशैल मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग विश्वसंचार करत असताना काही काळ चपळगाव येथे स्थिरावले होते. त्यावेळी त्यांनी येथे महादेवाच्या पिंडीची म्हणजेच शिवलिंगाची स्थापना केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.


मंदिराची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिरात तीन गाभारे असून समोर भव्य दगडी मंडप आहे. मुख्य गाभाऱ्यात महादेवाची शिवलिंग पिंड असून मंडपात कोरीव काम केलेला आकर्षक दगडी नंदी विराजमान आहे. उजव्या बाजूच्या गाभाऱ्यात श्री भ्रमरांबिका मातेची मूर्ती तर डाव्या बाजूच्या गाभाऱ्यात श्री नागनाथाची दगडी मूर्ती आणि आणखी एक शिवलिंग आहे. मुख्य गाभाऱ्यातील श्री मल्लिकार्जुन महाराजांची तेजस्वी व आकर्षक मूर्ती भाविकांचे मन सहज मोहून टाकते.
मंदिरासमोर विस्तीर्ण व भव्य पटांगण असून ईशान्य दिशेला एक लहान पण खोल विहीर आहे. या विहिरीत वर्षभर पाणी असते. या पाण्याने पूजाअर्चा करणे गावकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. मंदिरासमोर बांधण्यात आलेला प्रशस्त सभामंडप यात्रेच्या वेळी भाविकांनी गजबजून जातो.

दरवर्षी चैत्र शुद्ध एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी या तीन दिवशी येथे श्री मल्लिकार्जुन महाराजांची भव्य यात्रा भरते. यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे महारुद्राभिषेक होतो. दिवसभर पूजाअर्चा, गावातील सर्व देवतांना तैलाभिषेक करण्यात येतो आणि रात्री काठ्यांची मिरवणूक काढली जाते.
दुसरा दिवस हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. पहाटे महाराजांना महारुद्राभिषेक आणि महानैवेद्य अर्पण करण्यात येतो. रात्री नागफणीने सजवलेल्या नंदीकाठ्यांची भव्य मिरवणूक काढली जाते. या सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात.
तिसऱ्या दिवशी महारुद्राभिषेक, महाप्रसाद आणि पारंपरिक जंगी कुस्त्यांचे आयोजन केले जाते. या कुस्त्यांना परिसरातील अनेक नामांकित पैलवान सहभागी होतात.
या यात्रेचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे चैत्र महिन्यातील एक अद्भुत खगोलीय योग. यात्रेच्या पहिल्या दिवशी उगवत्या सूर्याची कोवळी किरणे मंदिराच्या प्रवेशद्वारातून थेट महादेवाच्या पिंडीवर पडतात. हा निसर्ग आणि श्रद्धेचा अद्वितीय संगम पाहण्यासाठी भाविकांची विशेष गर्दी होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

आज चपळगावचे श्री मल्लिकार्जुन मंदिर हे भाविकांसाठी जागृत देवस्थान तर इतिहास अभ्यासकांसाठी मौल्यवान अभ्यासाचा विषय ठरले आहे. प्राचीन स्थापत्यकला, धार्मिक परंपरा आणि भक्तिभाव यांचा संगम असलेले हे मंदिर म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे अनमोल लेणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button