गावगाथा

तरुणांनो जागे व्हा…!साक्षी कल्याणशेट्टी व शिवानी मनगुळे या दोघीनींही आजच्या तरुणांना दिलाय मार्मिक संदेश…!

यशोगाथा

🪄तरुणांनो जागे व्हा…!साक्षी कल्याणशेट्टी व शिवानी मनगुळे या दोघीनींही आजच्या तरुणांना दिलाय मार्मिक संदेश…!
===================

प्रत्येक चपळगांवकरांसाठी आनंद-अभिमान-सार्थक वाटावा अशा दोन सकारात्मक बातम्या दोन दिवसांपासुन मिळत आहेत.ज्यामधुन भरकटलेल्या आजच्या तरुणाईला मार्मिक संदेश मिळाला आहे.सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या साक्षी सुरेश कल्याणशेट्टी व शिवानी सुरेश मनगुळे या दोन मुलींनी अशक्य ते शक्य करुन दाखवले आहे.प्रतिकुल परिस्थितीवर मात करत या दोन्ही तरुणींनी आपले आईवडील अन् चपळगावचे नांव उज्वलित केले आहे.
भंडारकवठे गल्ली ही चपळगावांतील कष्टकऱ्यांची गल्ली.इथ वास्तव्यास असणारी माणसं ही स्वाभिमानी,कष्टाळु अन् तितकीच प्रामाणिक! सुरेश कल्याणशेट्टी व त्यांचे कुटुंबीय सततच धडपडणारे.न थांबता संघर्ष करणारे.विशेष म्हणजे त्यांना तीनही अपत्ये मुलीच.परंतु वंशाचा दिवा आपल्याला नाही हा चुकीचा विचार त्यांनी कधीच केला नाही. आज सामाजिक परिस्थितीकडे पाहिल्यास ज्यांच्या पोटी मुलगा नाही त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो.परंतु सुरेश कल्याणशेट्टी व त्यांच्या कुटुंबीयांनी हा दृष्टिकोन पार बदलून काढला आहे.आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी कल्याणशेट्टी परिवाराने अहोरात्र मेहनत घेतल्याचे सिद्ध होते.सुरेश कल्याणशेट्टी यांच्या सौभाग्यवतींनी आपल्या पतीराजाला व मुलींना भरभरुन साथ दिली आहे, हे खुपच कौतुकास्पद आहे.
त्यांच्या तीनही मुलींनी उच्च शिक्षण घेऊन समाजासमोर स्वतःला सिद्ध केले आहे. साक्षीने नुकतीच पालघर पोलीस दलात आपल्या कष्टातून नियुक्ती मिळवली.यापूर्वी दोन वेळा तिला अपयश आले होते, परंतु न खचता तिने आपला प्रवास सुरु ठेवला व यश मिळविले.आजची पिढी अपयश आल्यानंतर खचते किंवा चुकीचे पाऊल उचलते,पण साक्षीने जिद्दीच्या व कष्टाच्या बळावर जे यश प्राप्त केले ते अनमोल आहे..!
शिवानी सुरेश मनगुळे ही दुसरी मुलगी जिने पुणे पोलीस दलात नोकरी मिळविली.चपळगावातील बसवनगरसारख्या सर्वसामान्यांच्या लोकवस्तीत राहणारी ही मुलगी.व्यसनात गुरफटलेला अन् मृत्युच्या दारी पोहोचुन सुदैवाने वाचलेला बाप सुरेश मनगुळे…!अन् आशा वर्कर म्हणुन स्वाभिमानाने जगणारी आपली आई.अशी प्रतिकुलता..! सुरेश मनगुळे हे स्वभावाने विनम्र.आपल्या पत्नीची भक्कम साथ व पोटी जन्माला आलेल्या कर्तृत्ववान मुलींमुळे त्यांचेही जीवन सार्थक झाले आहे.शिवानीने कधीही प्रतिकूल परिस्थितीचा विचार केला नाही याउलट असेल त्या परिस्थितीत तिने जिद्दीने आपल्या भरतीसाठी अहोरात्र कष्ट घेतले व ते शक्यही करून दाखवले.शिवानीने मिळवलेले यशदेखील अनमोल आहे.
*मुलापेक्षा मुलगी बरी, उध्दार करते दोन्ही घरी…!*
अशा घोषणा आपल्या शालेय जीवनात बेंबीच्या देठापासुन ओरडुन द्यायचो.या दोन्ही मुलींचे यश पाहता हे खरच आहे.आज सामाजिक परिस्थितीकडे बघितल्यास सगळीकडेच विदारक अवस्था निर्माण झाली आहे.विशेषतः तरुणांना याबाबतीत खुप शिकण्याजोगे आहे.व्यसन,मोबाईल,आणि इतर गोष्टींच्या पाठीमागे लागुन आपण आपले सुंदर आयुष्य बरबाद करुन घेत आहोत,याची कल्पना त्यांना नाही.अन् आपले मन हे स्वीकारतही नाही.परंतु आजचे तरुण कधी जागे होणार हा मुळ प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या बापाला अन् आईला या समाजासमोर ताठ मानेने जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या साक्षी कल्याणशेट्टी व शिवानी मनगुळे या दोन मुलींच्या कर्तृत्वाकडे पाहिल्यास आपणही जबाबदार मुलगा म्हणुन जाणीवेने वागले पाहिजे हा धडा आपल्याला निश्चीतच मिळणार आहे.आपण स्वतःला सिध्द करण्यासाठी वाईट गोष्टींना मुठमाती दिली पाहिजे.जर मुली आईबापाला सुख,समाधान अन् प्रतिष्ठा मिळवुन देऊ शकतात मग वंशाचा दिवा म्हणुन मी हे का करु शकत नाही असा विचार आजच्या तरुणांनी निश्चीतपणे करावा, हीच अपेक्षा…!

✍🏼आपलाच-शंभुलिंग अकतनाळ,चपळगांव✍🏼

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button