सुपारीवर साकारले संपूर्ण ‘अष्टविनायक’; डॉ.संदीप डाकवे यांची थक्क करणारी सूक्ष्म कला!

तळमावले (प्रतिनिधी ): कलेला कोणतीही सीमा नसते आणि कल्पकतेला आकाराचे बंधन नसते, हे पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील हरहुन्नरी कलाकार डॉ. संदीप डाकवे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्यांनी अवघ्या ३ सेमी व्यास आणि २ सेमी उंची असलेल्या छोट्याशा सुपारीवर केवळ १ बाय १ सेमी या अत्यंत सूक्ष्म आकारात संपूर्ण अष्टविनायक रेखाटण्याची किमया साधली आहे. त्यांच्या या अद्वितीय सूक्ष्म कलेचे (मायक्रो-आर्ट) सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.
सूक्ष्म कलेमध्ये विशेष हातखंडा असलेल्या डॉ. डाकवे यांचा कलाप्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. सुपारीवर अष्टविनायक साकारण्यापूर्वी त्यांनी खडू, मोरपीस आणि अगदी तांदळाच्या दाण्यावरही अष्टविनायकाचे विलोभनीय दर्शन घडवले आहे. अत्यंत एकाग्रता, संयम आणि अचूकतेची मागणी करणाऱ्या या कलेत त्यांनी कमालीचे प्राविण्य मिळवले असून, त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून हे कौशल्य ठळकपणे दिसून येते.
केवळ सूक्ष्म कलाच नव्हे, तर ‘अक्षरगणेशा’ या प्रकारानेही त्यांनी रसिकांची मोठी दाद मिळवली आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकांची नावे आणि त्यांची तीर्थक्षेत्रे अत्यंत कल्पकतेने गुंफून त्यांनी त्यातून गणरायाचे मनमोहक रूप साकारले आहे. याशिवाय जाळीदार पिंपळपानावर कलाकृती, विविध वाद्ये वाजवणारे बाप्पा आणि नानाविध प्रकारांमधील गणेश पोस्टर रेखाटनांतून त्यांची गणरायावरील अढळ भक्ती आणि कलासक्ती स्पष्टपणे अधोरेखित होते. अत्यंत संयमाने आणि कौशल्याने साकारलेल्या त्यांच्या या नव्या सुपारीवरील अष्टविनायक कलाकृतीमुळे कलाक्षेत्रात त्यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा रंगली असून, परिसरातील कलाप्रेमी आणि नागरिकांकडून डॉ. संदीप डाकवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम: ‘एक अक्षरगणेशा स्वच्छतादूतांसाठी’
या कलात्मक सुवर्णमहोत्सवासाोबतच, यंदाच्या गणेशोत्सवाचे आणि सुपुत्र चि. स्पंदन डाकवे याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. डाकवे यांनी एक अत्यंत महत्त्वाची सामाजिक संकल्पना हाती घेतली आहे. ‘एक अक्षरगणेशा स्वच्छतादूतांसाठी’ असे या उपक्रमाचे नाव असून, यादरम्यान स्वच्छता ठेवणाऱ्या स्वच्छतादूतांच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी हातभार लावणे हा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी डॉ. संदीप डाकवे यांच्याकडून आपल्या आवडीचा ‘अक्षरगणेशा’ रेखाटून घ्यायचा असून, त्या बदल्यात रुपये १०० किंवा स्वेच्छेने त्यापटीत मूल्य जमा करायचे आहे. यातून संकलित होणारा संपूर्ण निधी थेट स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मूलभूत गरजांसाठी वापरला जाणार आहे. यामुळे नागरिकांना हवा असलेला ‘अक्षरगणेशा’ मिळण्यासोबतच एका अत्यंत चांगल्या कार्यात सहभागी झाल्याचे आत्मिक समाधानही लाभणार आहे. कला आणि समाजसेवा यांचा हा अनोखा संगम सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.

