गावगाथा

गुणवत्तेला कौशल्याची जोड आवश्यक : सचिन वायकुळे

बौद्धिक व्याख्यानमालेचा शुभारंभ

गुणवत्तेला कौशल्याची जोड आवश्यक : सचिन वायकुळे
अक्कलकोट, दि. १५ : आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक गुणवत्ता पुरेशी नसून, त्यास आवश्यक कौशल्यांची जोड मिळणे गरजेचे आहे. ज्ञान, गुणवत्ता आणि कौशल्य यांचा योग्य समन्वय साधल्यास विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होऊन करिअरच्या विविध संधींचा प्रभावीपणे उपयोग करून घेता येतो, असे प्रतिपादन बार्शी येथील व्याख्याते सचिन वायकुळे यांनी केले.

येथील सी. बी. खेडगी बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स अँड राजा जयसिंह आर्ट्स कॉलेज आणि अक्कलकोट महाविद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त आयोजित बौद्धिक व्याख्यानमालेचा शुभारंभ झाला. व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात ‘गुणवत्तेला कौशल्याची जोड हवीच’ या विषयावर सचिन वायकुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. संस्थेच्या उपाध्यक्षा भारतीताई खेडगी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी होते.
व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉ. किशोर थोरे, उपप्राचार्या वैदेही वैद्य, पर्यवेक्षक निलप्पा भरमशेट्टी, पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कोरे, उपाध्यक्ष डॉ. अशोक माळगे, सचिव दत्तात्रय होटकर यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना वायकुळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणासोबतच संवादकौशल्य, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, वेळेचे नियोजन, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक आहे. बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये नवनवीन कौशल्ये विकसित करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच भविष्यातील संधींचा प्रभावीपणे लाभ घेता येईल. गुणवत्ता ही यशाची पायाभरणी आहे, तर कौशल्य हे त्या गुणवत्तेला योग्य दिशा देणारे माध्यम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पदवीसोबतच विविध कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज असून, विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेला कौशल्याची जोड देत बदलत्या आव्हानांचा आत्मविश्वासाने सामना करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी माजी उपप्राचार्य परमेश्वर अरबाळे, माजी मुख्याध्यापक धुळप्पा भजे, महेश कलशेट्टी, प्राध्यापकवर्ग, शेकडो विद्यार्थी, युवक-युवती तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैष्णवी चांगभले यांनी सूत्रसंचालन केले, तर संचालिका विजया कोन्हाळी यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button