पतंजली: योगगुरू रामदेव बाबांची पतंजली सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल ; याप्रकरणी तिघांना कारावासाची शिक्षा

पंतजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक, योगगुरू रामदेव बाबा फसव्या जाहिरातींमुळे अडचणीत आले आहेत. त्यातच आता पतंजली कंपनीने आणलेली सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल झाली आहे. त्यामुळे न्यायालयाने कंपनीच्या सहायक व्यवस्थापकासह तिघांना कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीचे सहायक व्यवस्थापक अभिषेक कुमार, वितरक अजय जोशी आणि व्यावसायिक लीलाधर पाठक अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. या तिघांना अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 चे कलम 59 नुसार सहा महिन्यांच्या कारावासाची व दंडाची शिक्षा झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंतजली कंपनीची शेकडो उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. अनेक उत्पादनांना ग्राहकांची चांगली मागणी आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून कंपनीचे व्यवस्थापक व योगगुरू बाबा रामदेव यांच्यामागे कारवाईचा ससेमिरा लागला. सर्वोच्च न्यायालयाने फसव्या जाहिरात प्रकरणी रामदेव बाबा आणि कंपनीला खडेबोल सुनावले होते. तसेच कारवाई देखील केली होती.

17 ऑक्टोबर 2019 रोजी उत्तराखंडच्या पिथोरागड येथील बेरीनागमधील मुख्य बाजारपेठेतील लीलाधर पाठक यांच्या दुकानाला अन्न सुरक्षा निरीक्षकांनी भेट दिली. निरीक्षकांनी दुकानातील काही खाद्य पदार्थांची तपासणी केली. या तपासणीमध्ये त्यांनी पतंजली नवरत्न इलायची सोनपापडीबाबत चिंता व्यक्त केली. दुकानातील सोनपापडीचे काही नमुने गोळा करून रामनगर येथील पंतजली सोनपापडीचे वितरक कान्हा जी आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांना नोटीस बजावण्यात आली होती.

यानंतर अन्न निरीक्षकांनी इतरही शहरांमधून सोनपापडीचे काही नमुने जोला केले. ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. प्रयोगशाळेकडून डिसेंबर 2020 मध्ये अहवाल आला. त्यामध्ये पतंजलीच्या सोनपापडीची गुणवत्ता निकृष्ठ असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. हे प्रकरण पिथोरागड न्यायालयात गेले. न्यायालयाने तिघांना कारावासाची शिक्षा सुनावली आहे.