Akkalkot : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रेंचा शिवसेनेत प्रवेश ; ११ तास माझी वाट पाहणाऱ्या अक्कलकोटकर जनतेसमोर मी नतमस्तक – शिंदेंची दिलगिरी

अक्कलकोट – काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. अक्कलकोट येथे पार पडलेल्या भव्य मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “म्हेत्रे बंधू ही राम-लक्ष्मणाची जोडी असून त्यांचा म्हेत्रे कुटुंबीयांचा सामाजिक वारसा भक्कम आहे. त्यांनी जात-पात, धर्म न पाहता नेहमी जनतेच्या हितासाठी लढा दिला आहे. आज त्यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा भगवा हाती घेतल्याने अक्कलकोट, सोलापूर आणि दुधनीचा विकास अवश्य होईल, यात शंका नाही.”

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सभेत जमा झालेल्या लोकांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की, “११ तास माझी वाट पाहणाऱ्या अक्कलकोटकर जनतेसमोर मी नतमस्तक आहे.”

मेळाव्यात डॉ. नीलम गोऱ्हे, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार राजू खरे, माजी आमदार शहाजी बापू पाटील, ज्ञानराज चौगुले, मंगेश चिवटे, प्रा. ज्योती वाघमारे, मनिष काळजे, शिवाजी सावंत, महेश साठे, अमोल शिंदे यांच्यासह हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते.
