सलग सुट्यामुळे गेल्या आठ दिवसात श्रीक्षेत्र अक्कलकोटला येणार्या वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ
सुमारे 75 हजार वाहने येवून गेली. गेल्या दहा वर्षातील गर्दीचा उच्चांक

अक्कलकोट, दि.17 : सलग सुट्यामुळे गेल्या आठ दिवसात श्रीक्षेत्र अक्कलकोटला येणार्या वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. सुमारे 75 हजार वाहने येवून गेली. गेल्या दहा वर्षातील गर्दीचा उच्चांक झाला आहे.
राज्यासह परराज्य, परदेशातील स्वामी भक्तांची संख्या अधिक वाढत चालल्याने दररोजची गर्दी श्रींच्या दर्शनाकरिता वाढत चालली आहे. सदरच्या आलेल्या वाहनांना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे पार्किंग वगळता अन्य कोठेही प्रशस्त वाहनतळ नसल्याने सोलापूर बायपास रोड, कमलाराजे चौक, श्री शहाजी प्रशाला परिसरसह मिळेल त्या ठिकाणी दुतर्फा वाहने उभी करण्यात आलेली होती. याबरोबर मोठ्या प्रमाणात एसटी स्टँड परिसर, वटवृक्ष मंदिर, मैंदर्गी रोड, अन्नछत्र मंडळ परिसर, हत्ती तलाव, बासलेगाव रोड, थडगे मळा रोड, नगरपालिका परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी पहायला मिळाली.
वळसंग येथील टोलच्या गणनेनुसार सदर वाहनांची ये-जा गणनेनुसार सुमारे 75 हजार वाहनांची नोंदली आहेत. वाढते वाहनांचे प्रमाण पाहता त्याप्रमाणे सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी स्वामी भक्तांतून होत आहे.
विक्रमी गर्दीमुळे आलेल्या स्वामी भक्तांना राहणेसाठी खोल्या मिळाल्या नाहीत. निवासाची भक्त निवास, यात्री निवास, यात्री भुवन हाऊसफुल्ल झाले. त्यामुळे अनेक भक्तांना निवासासाठी सर्वत्र फिरावे लागल्याचे चित्र होते. अवास्तव वाहनामुळे वाहतुक व्यवस्था सुरळीत हाताळण्याकामी वाहतुक पोलिसांना दमछाक झाले.
नियमित होत चाललेली वाहनांची गर्दी पाहता प्रशस्त वाहनतळ, स्थानिक रिक्षावाल्यांना वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे, ठरलेल्या ठिकाणीच रिक्षांचा थांबा याबरोबरच रिक्षाचालकांची अरेरावी थांबली पाहिजे. या सर्व बाबी गर्दीच्या निमित्ताने समोर आलेली आहे. आता श्रावण महिना सुरु झाल्याने सर्वच दिवस पवित्र मानले जातात. अधिक मासापेक्षा श्रावण मासात देखील दुपटीने गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून वेळीच पावले उचलण्याची मागणी होत आहे.
अन्नछत्र मंडळ ते देवस्थान जाणारा रस्ता मोकळा करण्याची मागणी स्वामी भक्तांतून होत आहे.
