गावगाथा

राज्यात 2287 बालविवाह रोखले; 10वी-12वीच्या परीक्षेनंतर सर्वाधिक विवाह, 9 जिल्हे आघाडीवर*

गुपचूप बालविवाहांचा शोध नाहीच

राज्यात 2287 बालविवाह रोखले; 10वी-12वीच्या परीक्षेनंतर सर्वाधिक विवाह, 9 जिल्हे आघाडीवर*

सोलापूर : कोरोनानंतर राज्यात बालविवाहांचे प्रमाण खूपच वाढले आहे. तीन वर्षांत बाल संरक्षण समित्यांनी तब्बल दोन हजार २८७ बालविवाह रोखण्यात आले आहेत. परभणी, बीड, सोलापूर, नगर व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये बालविवाहांचे प्रमाण अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
विशेष बाब म्हणजे दहावी-बारावीची परीक्षा संपल्यावर मार्च ते जून या महिन्यांमध्ये अधिक बालविवाह झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
राज्यात एप्रिल २०२० ते मार्च २०२३ या काळात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक २१५, परभणी जिल्ह्यात १९१, बीड जिल्ह्यात १७७, छत्रपती संभाजी नगर १२४, नगर जिल्ह्यातील १२०, कोल्हापूर जिल्ह्यात ११३, नांदेड जिल्ह्यात १०६, यवतमाळ १०२ व जालना जिल्ह्यात १०७ असे बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समित्यांना यश मिळाले आहे.

दहावी-बारावीची परीक्षा संपल्यानंतर लग्नसराईत पालक मुलींचा बालवयातच (१८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच) विवाह लावून देतात. १५ ते १७ या वयोगटातील मुलींचे प्रमाण त्यात अधिक आहे. बालविवाहांमुळे बाल-अर्भक व मातामृत्यू वाढले असून कुपोषणाचा विळखा देखील वाढत आहे. पालकांचा अशिक्षितपणा, कामानिमित्त सततचे स्थलांतर, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि बेरोजगारी अशा प्रमुख कारणांमुळे बालविवाह वाढले आहेत.
दरम्यान, आता कायद्यानुसार बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्यांच्या कर्तव्यात वाढ झाली असून पोलिस, बालकल्याण समिती, बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्यांची कर्तव्ये निश्चित केली गेली आहेत. त्यामुळे बालविवाह कमी होतील, अशी आशा आहे.

*गुपचूप बालविवाहांचा शोध नाहीच*
कोरोनानंतर ऑनलाइन क्लासेसचे प्रमाण वाढले असून सध्या दहावीनंतरच्या बहुतेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल आहे. त्यातच सोशल मीडियाचा वापर देखील वाढला आहे. दुसरीकडे मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याची चिंता पालकांना लागली आहे. बालविवाह प्रतिबंध कायदा २००६नुसार मुलीचे वय १८ होण्यापूर्वी विवाह करणे कायद्याने गुन्हा असतानाही प्रमाण वाढले, हे विशेष. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीणमध्ये ही प्रथा पुन्हा सुरु झाली आहे. बालसंरक्षण समित्यांनी तीन वर्षांत जवळपास २२८७ बालविवाह रोखले, पण कोणालाच माहिती होऊ न देता मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत गुपचूप विवाह उरकले जात असल्याचीही वस्तुस्थिती आहे. शाळांमधील मुलींच्या उपस्थितीवरून ते स्पष्ट होऊ शकते.

*तीन वर्षांत रोखलेले बालविवाह*
२०२०-२१ : ५१९
२०२१-२२ : ८३८
२०२२-२३ : ९३०

*बेरोजगारी अन्‌ स्थलांतरामुळे बालविवाह*
राज्याची लोकसंख्या वाढली असून तेवढ्या प्रमाणात रोजगार तथा नोकरीची उपलब्धता नाही. त्यामुळे बीड, सोलापूर, धाराशिव, परभणी, धुळे, जालना अशा जिल्ह्यांमधून अनेकजण रोजगारासाठी दरवर्षी स्थलांतर करतात. स्थलांतरावेळी वयात आलेल्या मुलीला सोबत घेऊन जाणे पालकांना चिंतेचे वाटते. त्यामुळे पण बालविवाह वाढल्याचे बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button