शरण संकुल आयोजित ‘इष्टलिंग आविष्कार दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा.
मकर संक्रांती सणाचे औचित्य साधून रविवार दि.15 जानेवारी, 2023 रोजी वाशी, नवी मुंबई येथे लिंगायत समाजाचा ‘इष्टलिंग आविष्कार दिवस व मकर संक्रांती उत्सव’ मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला.

शरण संकुल आयोजित ‘इष्टलिंग आविष्कार दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा.

नवी मुंबई : मकर संक्रांती सणाचे औचित्य साधून रविवार दि.15 जानेवारी, 2023 रोजी वाशी, नवी मुंबई येथे लिंगायत समाजाचा ‘इष्टलिंग आविष्कार दिवस व मकर संक्रांती उत्सव’ मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला. गेल्या पंचवीस वर्षापासून ‘शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी’ ही संस्था या कार्यक्रमाचे आयोजन करत आली आहे. लिंगायत धर्मातील विविध संस्कार व लिंगायत संस्कृतीची नवीन पिढीला ओळख व्हावे यासाठी अनोख्या पद्धतीने हा कार्यक्रम साजरा केला जातो.

महात्मा बसवेश्वरांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमास प्रारंभ झाला. सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना कु.ऐश्वर्या साखरे हिने शिवस्तुतिपर नृत्य सादर करत सर्व उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर, कन्नड, मराठी व हिन्दी भाषेतील सुमधुर गीतांचा संगीतमय कार्यक्रम सुरू झाला. श्री बसू सीरसंगी, सुमित्रा डावरे आणि प्रगती तुरेकर यांनी अतिशय मधुर आवाजात गाणी गात सर्वांना मंत्रमुग्ध केले. श्री जिप्सन यांनी वेगवेगळ्या वेशभुषेत विविध पात्र सादर केली. त्यानंतर, कु.ऐश्वर्या साखरे हिने शांभवी गवी, वैभव, मनोज, संकल्प कुडल, प्रणव गजाराम, सन्निधी, स्नेहा, जान्हवी, श्राविल, शुभम हिरेमठ या सर्व लहान मुलांसह ‘इष्टलिंग आविष्कार’ नृत्य अनोख्या पद्धतीने सादर करत इष्टलिंग पूजेचे आपल्या जीवनातील महत्व नृत्याच्या माध्यमातून विशद केले. तदनंतर, लहान मुलांचा ‘बोरन्हाण’ हा संस्कार विधी खूप आनंदात आणि धुमधडाक्यात पार पडला. पाच वर्षे वयाच्या आतील सुमारे चाळीस मुलांनी या संस्कारचा लाभ घेतला. या सर्व मुलांना मंचावर एका रांगेत आपापल्या आईच्या मांडीवर बसवून सर्व उपस्थितांच्या समोर श्री चंद्रशेखर नंदीकोल स्वामी यांनी मंत्रोच्चाराने मंचावर बसलेल्या लहान मुलांच्या डोक्यावरून फळ-फुले, सुकामेवामिश्रित कुरमुरे वगैरे पदार्थांचा अभिषेक घालण्यात आला. या सर्व मुलांना शरण संकुल तर्फे सुंदर खेळणी भेट देण्यात आले. रूमा कत्रोळी या लहान मुलीने सुंदर नृत्य केले.

शरण संकुलच्या अक्कमहादेवी महिला मंडळातील महिला सदस्य स्नेहा हळ्ळी, ज्योति गजाराम, शोभा उमापति, सुवर्णा मेणकुदले, सुनीता बिराजदार, वैशाली मेणकुदले, अॅड.रुचिरा गुळवे, सुषमा हसबी यांनी सर्व उपस्थित महिलांचा हळद-कुंकू व भेट वस्तु देऊन सन्मान केला. समाजातील प्रतिथयश ज्येष्ठ नागरिकांचा व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा संस्थेच्या वतीने महात्मा बसवेश्वरांची प्रतिकृति व विभूति देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, नवी मुंबई परिसरातील लिंगायत समाज खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होता, संपूर्ण सभागृह उपस्थितांनी भरून गेले होते. सहा महिन्याच्या बाळापासून ते नव्वद वर्षाच्या आजोबापर्यंत सर्वांनी या सुंदर कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष

जी.बी.रामलिंगय्या, मुख्य विश्वस्त शिवयोगीमठ, जी.एच.जगदीशप्पा, के.उमापति, सुनील पाटील, स्नेहा हळ्ळी, व्ही.एस.मेत्री, प्रकाश अवरनळ्ळी, डॉ.अशोक कल्याणशेट्टी, भीमाशंकर संगोळीकर, उमेश मंठाळे, आनंद सो. गवी व इतर पदाधिकारी आणि सदस्यांनी मेहनत घेतली. आपली मते व सूचना आपण शरण संकुलच्या sharanasankul@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवू शकता.
