जेऊर येथे काशिविश्वेश्वर मंदिरात रजत सहस्त्रलिंग अभिषेक महोत्सव उत्साहत संपन्न ; 500 जोडप्यांनी केले सामूहिक इष्टलिंग पूजन
श्री काशिलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील व पदाधिकारी यांच्या संयोजनातून सदर धार्मिक विधी

जेऊर येथे काशिविश्वेश्वर मंदिरात रजत सहस्त्रलिंग अभिषेक महोत्सव उत्साहत संपन्न ; 500 जोडप्यांनी केले सामूहिक इष्टलिंग पूजन

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
तालुक्यातील जेऊर येथे स्वयंभू श्री काशिविश्वेश्वर मंदिरात श्रावण मासाचे औचित्य साधत आज तिसऱ्या श्रावणी सोमवारी विश्वशांती व जनकल्याण रजत सहस्त्रलिंग अभिषेक आणि रुद्राभिषेक व होम विधी संपन्न झाला. सुमारे 500 जोडप्यांनी सामूहिक रजत इष्टलिंग पूजन केले.

यावेळी ष. ब्र शिवायोगी शिवाचार्य महास्वामी नविंदगी संस्थान मठ यांच्या नेतृत्वात सदर विधी पूर्ण करण्यात आले. यावेळी सद्गुरू पांडुरंग महाराज जेऊर, श्री ष. ब्र श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी नागणसूर तसेच म.नि.प्र.विर शिवलिंगेश्वर महास्वामी कडबगांव संस्थान मठ कडबगाव यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री काशिलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील व पदाधिकारी यांच्या संयोजनातून सदर धार्मिक विधी गेल्या दोन दिवसापासून सुरु झालेल्या पाऊस व उल्हासमय वातावरण यात हा कार्यक्रम जल्लोषात साजरा झाला. आज सकाळपासून श्रावण धारा बरसत असूनही कार्यक्रमांस भविकांची मोठी गर्दी होऊन कार्यक्रमांस चांगला प्रतिसाद लाभला.

श्री काशिविश्वेश्वर मंदिरात संपूर्ण श्रावण मासात विविध धार्मिक विधी साजरे होतात. दररोज हजारो भाविक येथे येऊन दर्शन घेत असतात. विणा सप्ताह, प्रवचन आणि महाप्रसाद सेवा यामुळे पूर्ण गावात मोठे धार्मिक वातावरण असते त्यातच एकूण 500 जोडप्यांनी एकत्र येत सामूहिक रजत इष्टलिंग पूजन केले.

यावेळी आशीर्वचन करताना शिवयोगी शिवाचार्य महास्वामी म्हणाले कि, श्रावण मासाला पुरातन काळापासून मोठे धार्मिक महत्व आहे. या काळात आपण हे पूजन करीत आहात त्याने आपण खूप भाग्यवान आहात. सर्व ग्रामस्थ आज शिव नामाची आराधना करीत आहात ही चांगली गोष्ट आहे.सर्वांनी रूढी आणि परंपरा याचे जतन करीत चला त्यातून आपले भविष्य उज्वल राहणार आहे.कार्यक्रमाचे संयोजन श्री काशिविश्वेश्वर देवस्थान कमिटी व ग्रामस्थ मंडळी यांनी केले तर सूत्रसंचालन शंकर अजगोंडा यांनी केले.
चौकट : आज सकाळपासून पाऊस असूनही मंडप पूर्ण भरलेला होता तब्बल चार तास पूजा विधी व इतर धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे नेमके नियोजन, आकर्षक रजत इष्टलिंग आणि मन भारवणारे विविध धार्मिक विधी आणि पाच हजार पेक्षा जास्त भाविकांना दिला गेलेला महाप्रसाद आदींमुळे कार्यक्रम मात्र कमालीच्या जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाल्याचे पहावायस मिळाले.