Raj Thakare : आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे २२५ ते २५० जागा लढवणार ; राज ठाकरेंची घोषणा
मुंबई (प्रतिनिधी): आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेच्या 225 ते 250 जागा लढवण्याची घोषणा केली आहे.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी ही घोषणा केली आहे. यासाठी राज ठाकरे आता स्वत: मैदानात उतरणार आहेत. 1 ऑगस्टपासून मी महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे देखील राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
एवढेच नाही तर विधानसभेला कोणाशीही युती करण्याच्या भानगडीत पडणार नाही असे देखील राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीव्यतिरिक्त मनसे जनतेसमोर तिसरा पर्याय देण्याच्या तयारीत असल्याचे संकेत राज ठाकरे यांनी दिले आहेत. काहीही करून महाराष्ट्र सैनिकांना सत्तेत बसवणार असा निर्धार राज ठाकरे यांनी केला आहे. यासाठी राज ठाकरे स्वत: मैदानात उतरणार आहेत. पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही राज ठाकरे यांनी दिले आहेत.