
शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या वालच्या खड्ड्यात अडकली ट्रॅव्हल्स अनर्थ टळला
मुरूम, ता. उमरगा, ता. २५ (प्रतिनिधी) : शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात मंगळवारी (ता. २४) रोजी रात्री आठच्या सुमारास प्रवासी वाहतूक करणारी सोलापूर येथील ट्रॅव्हल्स खड्ड्यात जाऊन अडकली. सदर ट्रॅव्हल्स महाराष्ट्रातील भाविकांना देशाभरातील तीर्थक्षेत्र दर्शन करून परत आली. सोलापूर येथील प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच १३ बी ५१३४ ही विविध भागातील प्रवाशांना घेऊन उज्जैनसह तीर्थक्षेत्र दर्शन करून पुन्हा सोलापूरकडे परतत असताना मुरूम शहरातील भाविकांना सोडण्यासाठी शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात आली असता भाविकांना सोडून वाहन चालकाने रिव्हर्स घेत असताना याच चौकातील पाण्याच्या वॉल साठी भल्या मोठ्या खड्ड्याच्या एका बाजूला किन्नर बाजूकडील पुढील चाक ड्रायव्हरच्या नजरचुकीने खड्ड्याच्या बाजूने जाण्याऐवजी खड्ड्यात अडकल्याने जोराचा आवाज होऊन ट्रॅव्हल्स अडकली. दरम्यान मुसळधार पाऊस सुरू असल्याने ट्रॅव्हल्स खड्ड्यातून बाजूला काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या परंतु पाऊस थांबता क्षणी शहरातील नागरिकांनी ट्रॅव्हल्स खड्यातून बाहेर काढण्यासाठी चालकासह प्रचंड मेहनत घेऊन वाहन बाहेर काढण्यास मदत केली. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही परंतु वाहनाचे थोडेफार नुकसान झाले. नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी लहान-मोठे विविध अपघात सातत्याने घडत आहेत. शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या वालचा हा खड्डा असून यावर कायमस्वरूपी योग्य तो तोडगा काढून समस्या सोडविण्याची नागरिकांमधून मागणी होत आहे.
