PCMC Crime: पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी ; बनावट कर्ज काढून बॅंकेची फसवणूक करणाऱ्या टोळीस अटक
निगडी ( प्रतिनिधी): अल्पशिक्षित नागरिकांना उच्च शिक्षित असल्याचे दाखवून विविध बँकेकडून दोन कोटी २० लाखांचे परस्पर कर्ज घेतले. त्यानंतर कर्जाची परतफेड न करता संबंधित व्यक्ती, बँकेची फसवणूक केली. आर्थिक गुन्हे शाखेने फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक केली.

वासुदत्ता भारत डुबे, चंद्रकांत हरिदास मोरे, प्रकाश बळीराम थोरात, कृतिका पोलावर (डुबे), विनोद आण्णा शिंदे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुख्य संशयित वासुदत्त डुबे यास प्रकाश थोरात याने मजुरी काम करणारे अल्पशिक्षित व्यक्ती विनोद शिंदे, विजय शिंदे व दीपक जंगम यांची कागदपत्रे पुरविली.

यासाठी त्यांना कमिशन देऊन कर्ज प्रक्रियेसाठी तयार केले. सुरुवातीस मोबाइल व सिमकार्ड घेतले. ते वासुदत्ता याने स्वतःकडे ठेवले. नवीन सिमकार्ड व कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाते उघडले. वासुदत्ता याने अल्पशिक्षित व्यक्ती हे विविध कंपन्यामध्ये मॅनेजर, इंजिनिअर, एच.आर. पदावर नोकरीस असल्याचे दाखविले.

त्यानंतर बनावट पगार दाखल्याद्वारे त्यांचे खात्यावर पगाराची रक्कम भरली. त्यानंतर डुबे याने अशिक्षित व्यक्तींचे नावे विविध बँकांकडून गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज मंजूर करून घेतले. कर्ज घेताना डुबे याने अल्पशिक्षित व्यक्तींना वाघोली येथील फ्लॅटवर ठेवले होते. कर्ज मंजूर झाल्यानंतर काही हप्ते भरून नंतर कर्ज बुडीत केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

कृतिका पोलावर हिने बनावट पगार दाखल्याच्या आधारावर एकाच वेळी पाच बँकांकडून कर्ज मंजूर करून घेतले. काही हप्ते भरून कर्ज बुडवल्याचे निष्पन्न झाले. नितीन चांदराणी, संदीप दिनकर खरात, स्वरूप तानाजी लिभोरे यांचा सहभाग दिसून आल्याने त्यांनाही अटक केली.
