स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट वतीने गावगाथा दिवाळी अंकास २०२२ सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार : मानवता, गुणवत्ता आणि सृजनशीलतेचा संगम म्हणजे ‘स्पंदन’ – प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे
डाॅ.डाकवे यांच्याकडे समाजभान आहे’’ असे उद्गगार बिग बाॅस फेम अभिनेते किरण माने यांनी याप्रसंगी काढले.

स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट वतीने गावगाथा दिवाळी अंकास २०२२ सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार : मानवता, गुणवत्ता आणि सृजनशीलतेचा संगम म्हणजे ‘स्पंदन’ – प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे


माणसाच्या सत्कर्माची कृतज्ञतेने घेतलेली नोंद म्हणजे पुरस्कार असतात. समाजातील सुखदुःखाची स्पंदने जाणून घेण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते ते विचारवंत, कलावंतांकडे असते. ते आपल्या प्रतिभेतून जे विचारधन आणि आनंद निर्माण करतात, त्यावर मानवी जीवन समृद्ध होत असते. अशा सत्कर्मी व्यक्तींना पुरस्कार देऊन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने गौरव केला आहे. मानवता, गुणवत्ता आणि सुजनशीलतेचा संगम म्हणजे स्पंदन ट्रस्ट होय असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध वक्ते व विचारवंत प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे यांनी काढले.

कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्यतर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बिग बाॅस फेम अभिनेते किरण माने, ट्रस्टचे संस्थापक डाॅ.संदीप डाकवे, महाराष्ट्र केसरी पै.आप्पासाहेब कदम, पंजाबराव देसाई, ह.भ.प.विजय महाराज रामिष्टे, प्रा.ए.बी.कणसे, अभिनेते व लेखक सचिन पाटील, अभिनेत्री प्राजक्ता शिसोदे, अभिनेत्री डाॅ.सीमा पाटील, चंद्रकांत चव्हाण, अभिनेते प्रशांत बोधगीर, विकास पाटील, उमेश माने, गयाबाई डाकवे आदी मान्यवर उपस्थित होते.
डाॅ.यशवंत पाटणे पुढे बोलताना म्हणाले की, जीवनातील शाश्वत आनंद हा साठवलेल्या संपत्तीपेक्षा आयुष्यभर जपलेल्या मुल्यांवर अवलंबून असतो स्वतःला विसरून जे आपल्या कार्याशी एकरूप होतात आणि समाजाच्या भल्यासाठी झटतात त्यांच्या श्रम साफल्यात खरा आनंद असतो.

सध्या धर्मद्वेष, चंगळवाद आणि मूल्यहीन राजकारण यामुळे समाज जीवनाचे चित्र विस्कळीत आणि विचित्र झाले आहे अशा परिस्थितीत सामान्य माणसाला धीर आणि आधार देण्याचे कार्य डॉ.संदीप डाकवे आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून करत आहेत. ते आशावादी वृत्तीचे पत्रकार आणि चित्रकार आहेत समाजात प्रेम आणि विश्वास निर्माण करून मानवता, धर्म जपत आहेत त्यांच्या सेवा कार्याला बळ मिळाले पाहिजे.
आपल्याकडे काय नाही, यापेक्षा काय आहे हाच विचार माणसाचे आयुष्य पुढे घेऊन जाणारा ठरतो. जीवन हे सुंदरच असते. त्यात माणसाला सुंदरतेचे रंग भरता आले पाहिजेत. साऱ्या व्यवस्थेचा केंद्रबिंदू हा माणूस आहे. माणसांसाठी जगणारी माणसे हवीत. माणसाला जोडणारी माणसे हीच महत्त्वाची असतात, असेही डाॅ. पाटणे यांनी पुढे बोलताना म्हटले.

‘‘वसा सामाजिक बांधिलकीचा… हे वृत्त हाती घेऊन समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तीचा सन्मान डाॅ.संदीप डाकवे यांनी केला आहे, त्यासाठी असणारा मनाचा मोठेपणा डाॅ.डाकवे यांच्यामध्ये ठासून भरला आहे. स्पंदन ट्रस्टकडून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत काम करणाऱ्या व्यक्तींना शाबासकीची थाप द्यावी अशी अपेक्षा आहे. माझ्या पडत्या काळात ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली त्यामधील एक डॉ.संदीप डाकवे आहेत, त्यांचा कार्यक्रम हा माझा कार्यक्रम आहे. डाॅ.डाकवे यांच्याकडे समाजभान आहे’’ असे उद्गगार बिग बाॅस फेम अभिनेते किरण माने यांनी याप्रसंगी काढले.
दरम्यान, पै.आप्पासाहेब कदम, प्राजक्ता शिसोदे, डाॅ.सीमा पाटील, नितीन गवळी, विकास पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त करत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात डाॅ.डाकवे यांनी स्पंदन ट्रस्टच्या कार्याची माहिती आणि प्रमुख पाहुण्यांची ओळख करुन दिली. यावेळी डाॅ.यशवंत पाटणे यांना जीवनगोैरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाच हजार रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमात चि.स्पंदन डाकवे याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ट्रस्टतर्फे दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडी गावास मदत प्रदान करण्यात आली. विविध क्षेत्रांतील मान्यवरांना यावेळी प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड पुरस्काराने गोैरविण्यात आले. तसेच स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार, दिवाळी अंक स्पर्धा, सेल्फी विथ गुढी, भित्तीचित्र स्पर्धेमधील विजेत्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि तात्या हे पुस्तक देवून गौरवण्यात आले.
प्रा.सुरेश यादव यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. प्रा.ए.बी.कणसे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या प्रतिमा पुजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रम यषस्वी करण्यासाठी सुरेश मस्कर, विठ्ठल डाकवे, सुरेश जाधव, विशाल डाकवे, जीवन काटेकर, रेश्मा डाकवे, शीतल दवणे, गौरी डाकवे, पौर्णिमा डाकवे, प्रथमेष डाकवे, शंकर जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
*चौकट : वारकरी मुलांच्या उपस्थिताने वातावरण भारावले
श्री ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष ह.भ.प.विजय महाराज रामिष्टे यांच्या पुरस्काराप्रसंगी या संस्थेतील बालवारकरी टोपी, पंचा आणि वारकरी पोशाखात आले. त्यांनी व्यासपीठावर ‘‘बोला पुडलिका वरदे हरी विठ्ठल…’’ असा गजर केल्यानंतर सभागृहातील वातावरण एकदमच बदलून गेले. सर्वांनीच या मुलांचे आणि श्री ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचे कौतुक केले.