छ.शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास समजून घ्यायचा असेल तर शिवकालीन कविता समजून घ्यायला हवी : कवी हनुमंत चांदगुडे
जयंती विशेष

छ.शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास समजून घ्यायचा असेल तर शिवकालीन कविता समजून घ्यायला हवी : कवी हनुमंत चांदगुडे

वीररसातील खरी कविता ही शिवरायांच्या काळात लिहिली गेली. महाराजांचा दैदिप्यमान इतिहास समजून घ्यायचा असेल तर शिवकालीन कविता समजून घ्यायला हवी.
कुळवाडी-भुषण पवाडा गातो भोसल्याचा|
छत्रपती शिवाजीचा ||
हा पोवाडा लिहून महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांचे कार्य पुढे आणण्याचा प्रयत्न केला. शाहीर अमरशेख, संत तुकाराम यांनी आपल्या काव्यातून शिवरायांच्या कार्याचे गोडवे गायले असे प्रतिपादन कवी हनुमंत चांदगुडे यांनी केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघीरे महाविद्यालय, सासवड राष्ट्रीय सेवा योजना विभाग व बहि:शाल शिक्षण मंडळाच्या वतीने शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

शाहिराने थाप डपावर कडाडून द्यावी
आणि शिवकाळाची महाराष्ट्राला पुन्हा याद यावी.
याप्रसंगी त्यांनी पुरंदरच्या भूमितील कवी यशवंतराव सावंत यांची ही कविता सादर केली. तसेच गडकोट किल्ले, सवाल-जवाब या त्यांच्या कविता देखील सादर केल्या.
महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या साजऱ्या करताना वाद्यांचा गजर करण्यापेक्षा विचारांचा जागर करायला हवा. ध्वनी प्रदूषण, होर्डिंग आणि बॅनरबाजी न करता महापुरुषांनी सांगितलेल्या आदर्शवत विचार संस्काराचा जागर केला पाहिजे. असे मौलिक व प्रेरणादायी विचार डॉ. पांढरमिसे यांनी आपल्या ओघवत्या व झंझावाती शैलीत मांडले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती अनेक देशातील विद्यापीठात अभ्यासक्रम शिकविला जातो ही आपल्यासाठी सार्थ अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या तरुणाईने नाकारत्मकतेला छेद देऊन सकारात्मक विचारांचा अंगीकार करून कृतिशील मार्ग अंगीकारायला हवा. या कार्यक्रमप्रसंगी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी हे मौलिक विचार मांडले.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ. विशाल पावसे व बहि:शाल शिक्षण मंडळाचे केंद्र कार्यवाह डॉ. किरण गाढवे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी डॉ. नानासाहेब पवार, डॉ. रोहिदास ढाकणे, डॉ. विजय पुणेकर, डॉ. अनिल झोळ, डॉ. अजय गाढवे, डॉ. दीपक लोखंडे इत्यादी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी गणेश खोडके, अंकुश धायगुडे, संतोष लोणकर यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. समीर कुंभारकर यांनी केले. तसेच डॉ. किरण गाढवे यांनी आभार मानले.
