HSRP : हाय सेक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसविण्याची मुदत आता ३० नोव्हेंबर पर्यंत ; जुन्या वाहनधारकांना मोठा दिलासा

पुणे ( प्रतिनिधी ): राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी पूर्वी 31 मार्च 2025 ही अंतिम मुदत दिली होती. त्यानंतर संदर्भीय परिपत्रक क्रमांक 3 नुसार 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता विविध कारणास्तव ही मुदत आणखी वाढवण्यात आली असून, 30 नोव्हेंबर 2025 ही नवीन अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.


राज्यातील अनेक जुन्या वाहनांवर अजूनही HSRP बसवण्याचे काम बाकी आहे. शहरी भागांमध्ये अनेक वाहन मालकांना पुढील काही महिन्यांसाठीच बसवण्याची अपॉइंटमेंट मिळाली आहे. ग्रामीण भागात फिटमेंट केंद्र सुरू होण्यास उशीर झाला आहे, तर काही केंद्रे बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून मुदतवाढीची मागणीही करण्यात आली होती.

परिवहन विभागाच्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत HSRP बसवलेले नसलेले वाहन आढळल्यास 1 डिसेंबर 2025 पासून वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र, या तारखेपर्यंत HSRP बसवण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनमालकांवर कोणतीही कारवाई होणार नाही.
