तब्बल १४५ जणांनी एकसष्टी साजरी झाली एकाच कार्यक्रमात ह. दे. १९७८ ग्रुपचा उपक्रम
ह. दे. १९७८ ग्रुपचा उपक्रम

तब्बल १४५ जणांनी एकसष्टी साजरी झाली एकाच कार्यक्रमात ह. दे. १९७८ ग्रुपचा उपक्रम
सोलापूर : प्रतिनिधी
कोणी अमेरिकेहून तर कोणी ऑस्ट्रेलियाहून, कोणी मध्य प्रदेशातून तर कोणी राजस्थानातून आलेल्या तब्बल १४५ मित्रांची एकसष्टी एकत्रच साजरी झाली. निमित्त होते ह. दे. १९७८ ग्रुपने आयोजिलेल्या स्नेह मेळाव्याचे.
सोलापूर शहरालगत पाकणी येथील अभिषेक मळा येथे हा अनोखा कार्यक्रम झाला. १९७८ साली हरिभाई देवकरण प्रशालेतून १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ह. दे. १९७८ ग्रुप बनविला आहे. यातील सर्व सदस्यांनी यंदाच्यावर्षी वयाची ६१ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्त १४५ मित्रांनी एकत्र येत हुरडा पार्टी आणि स्नेह मेळावा आयोजित केला होता.
यावेळी डॉक्टर, वकील, उद्योजक, प्रोजेक्ट मॅनेजर, प्राध्यापक, राजकीय, सामाजिक अशा सर्व स्तरांतील माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी अभिषेक मळाचे संचालक राजू भंडारकवठेकर यांनी ६१ कणकेचे दिवे बनवून सर्वांना सपत्नीक ओवाळले. या माजी विद्यार्थ्यांनी क्रिकेटसह विटी दांडूसारखे अनेक खेळ खेळून पुन्हा लहान होण्याचा आनंद लुटला. याप्रसंगी परिसरातून या माजी विद्यार्थ्यांची मिरवणूकही काढण्यात आली.
या स्नेह मेळाव्यासाठी सोलापूरसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मध्य प्रदेश, राजस्थान, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपति संभाजी नगर, हैद्राबाद, सुरत आदी ठिकाणहून माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी मोहन डांगरे, प्रशांत बडवे, विठ्ठल कुलकर्णी, स्मिता पुरंदरे, प्रशांत देवस्थळी, मनीषा चारीवाले, कल्पना जक्कल, सुरेखा पुजारी – शर्मा, ॲड. बिपिन ठोकळ, अभय देसाई, सुजाता कामत, डॉ. मुकुंद राय, उल्हास सोनी, भूषण शहा आदी उपस्थित होते.
————-
चौकट
आई प्रतिष्ठानला ३० हजारांची देणगी
पुण्यातील स्मिता पुरंदरे संचलित सामाजिक कार्यकर्त्यांच्या समूहाकडून ३० हजार रुपयांची देणगी आई प्रतिष्ठानला देण्यात आली.
———–
दिवसभर मोबाईलला ठेवले दूर
ह. दे. १९७८ ग्रुपच्या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित राहिलेल्या माजी विद्यार्थ्यांनी दिवसभर मोबाईल दूर ठेवण्याचा निश्चय केला होता. त्यानुसार संपूर्ण दिवस मोबाईलपासून दूर राहत मोबाईलचा अतिवापर टाळण्याचा संदेश या माजी विद्यार्थ्यांनी दिला.