गावगाथा

स्मार्टफोनच्या जमान्यात पोस्ट कार्डचे पत्रे हातात पडतात….

स्मार्टफोनच्या जमान्यात पत्र कोण पाठवेल? हा प्रश्न तुमच्या मनात देखील नक्कीच आला असेल.

स्मार्टफोनच्या जमान्यात पोस्ट कार्डचे पत्रे हातात पडतात….

 

मोबाईलच्या जमान्यात हल्ली पत्र लिहीण्याचा प्रघात जवळपास बंदच झाला आहे. कारण इंटरनेट आणि मोबाईलच्या जमान्यात जग इतके जवळ आले आहे की पत्र लिहायला आणि वाचायला हल्ली कोणाला सवडच मिळत नाही ! स्मार्टफोनच्या जमान्यात पत्र कोण पाठवेल? हा प्रश्न तुमच्या मनात देखील नक्कीच आला असेल.
अशा परिस्थितीत अक्कलकोट तालुक्यातील बोदोले सारख्या छोटासा गावातून के.पी.गायकवाड हायस्कूल चे कलाशिक्षक मयूर दंतकाळे सरांचे अभिनव उपक्रम म्हणजे पुन्हा जुन्या आठवणी उजाळा देणारा आहे. दंतकाळे सर गेल्या अनेक वर्षांपासून देशातील महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना पोस्ट कार्ड ने पत्रलेखन करून शुभेच्छा पत्र पाठवतात आपल्या शाळेतील मुलांना विद्यार्थ्यांना पत्र लिहून घेऊन त्या त्या मान्यवरांना पोस्टाने पत्र पाठवतात.


काही दिवसांपूर्वी मला हि असेच पोस्ट कार्डने पत्रे मिळाली सुरवातीला मी भारावून गेलो.अतिशय सुंदर शब्दांत शाळेतील मुलीनी पत्रे स्वतः हाताने लिहून पाठविले आहेत.जवळजवळ अकरा विद्यार्थ्यांनी पत्र पाठविले आहेत.त्यात करिश्मा शेख, वैष्णवी व्हसुरे,अंकिता धर्मसाले, स्नेहा लवटे, ऐश्वर्या परीट, वैष्णवी बिराजदार,अल्फिया शेख, प्रगती बंडगर,स्वाती खरात,तस्लीम भाईजान,बुशरा मुल्ला आदिनी सुंदर शब्दांत पत्र पाठविले आहे.नविन वर्षांच्या पुढील उपक्रमासठी शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच कलाशिक्षक मयूर दंतकाळे यांनी ही पत्र पाठविले आहे गावाबद्दल माझं ओढ गावगाथा दिवाळी अंकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


ग्रामीण भागातील मुलांची शैक्षणिक प्रगती पाहून त्याची दूरदृष्टी मी थक्क झालो यासर्वाचे व त्यांना मार्गदर्शन करणारे कलाशिक्षक दंतकाळे सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या लहानपणी शाळेत असताना 35 वर्षांपूर्वी पत्रलेखन म्हणजे आवडीचा विषय सप्रेम नमस्कार, विनंती विशेष, पत्रास कारण की… या वाक्याने सुरवात व्हायची अन् संपूर्ण कुटुंबाची खुशाली कळायची. पोस्टमनकाका आल्यास त्याच्यामागे धावत धावत ‘आमचं पत्र आलं का?’असा प्रश्न विचारायचा. त्या पंधरा पैशांच्या पत्रातून खूप आनंद मिळत होता.आता काळ बदलला आणि सोशल मीडियाचा जमाना आला. त्यामुळे पोस्टाचा हा मायना नव्या पिढीला अपवादानेच माहिती आहे.
खरंतर पत्रलेखन ही एक कलाच आहे, पण हळूहळू आपण ती विसरत चाललो आहोत. पत्र लिहिणं तर दूरच आपण लिहिणंच विसरत चाललो आहोत.आता फक्त टायपिंग करणं हेच आपल्याला माहीत आहे.पत्र लिहिण्यात,ते पाठवण्यात आनंद तर होताच, पण पत्राची वाट पाहण्यातही एक मोठा आनंद होता.आपल्या घरून आलेली पत्रं सीमेवर लढणार्‍या जवानांना जगण्याचं बळ देत होती. गावाहून आलेली पत्रे हॉस्टेलवर शिकणार्‍या मुलांचा जगण्याचा आधार होती.पोस्टाच्या त्या लाल पेटीकडे बघून एक वेगळी भावना मनात निर्माण व्हायची.
बहुतांश निरक्षरता असलेल्या गावांमध्ये पोस्टमन हाच एक जाणता माणूस असायचा.गावकर्‍यांकडे आलेली पत्रं तोच उघडायचा, तोच वाचून दाखवायचा. घरातली माणसं तो काय वाचून दाखवतो त्याकडे कानात प्राण आणून ऐकायचे.पोस्टमन हा सगळ्यांच्या घरातलाच एक माणूस होऊन जायचा.अनेक आठवणींना उजाळा मला आलेल्या पत्र वाचताना हरवून गेला


मात्र, आजही भारतातील काही ठिकाणी पत्र हेच एकमेकांशी संपर्क करण्याचं साधन आहे.एक काळ असा होता, जेव्हा लोक दिवस-रात्र पत्रांची वाट पाहत असे. मात्र, बदलत्या काळाबरोबरच आणि तंत्रज्ञानाबरोबर मोबाईल, सोशल मीडियामुळे क्षणात कोणाशीही संवाद साधता येतो.आजच्या युवा पिढीला पत्र, पोस्टकार्ड आणि ग्रिटिंगचे महत्त्व हवे तेवढे वाटत नाही.एकेकाळी लोकांसाठी पत्र म्हणजेच सर्वकाही होतं.हे मात्र तितके खरं आहे.शेवटी गेलं ते राहिले फक्त आठवणी..
या पुढे मी पण पोस्ट कार्डने पत्र पाठविण्याचा प्रयत्न करणार आहे..

आपलाच — धोंडपा नंदे,
9850619724

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button