स्वामींच्या १४६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त वटवृक्ष मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
दि.२४ एप्रिल पासून श्री.स्वामी पुण्यतिथी महोत्सवास प्रारंभ.

स्वामींच्या १४६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त वटवृक्ष मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

श्री स्वामी पुण्यतिथी सोहळा परंपरेनुसार साजरा होणार – महेश इंगळे

दि.२४ एप्रिल पासून श्री.स्वामी पुण्यतिथी महोत्सवास प्रारंभ.

(प्रतिनिधी अक्कलकोट,
(श्रीशैल गवंडी) – यंदा श्री स्वामी समर्थांची १४६ वी पुण्यतिथी सोमवार दिनांक ६ मे रोजी आहे. श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील परंपरेनुसार साजरे होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम व धर्मसंकीर्तन महोत्सव येथील श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या वटवृक्ष मंदिरात यंदा परंपरेनुसार संपन्न होणार आहेत अशी माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. यंदाचा श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा कालावधी शके १९४६ क्रोधीनाम संवत्सरे, चैत्र वद्य प्रतिपदा ते चैत्र वद्य त्रयोदशी बुधवार दिनांक २४ एप्रिल २०२४ ते सोमवार दिनांक ६ मे २०२४ अखेर आहे. या पुण्यतिथी महोत्सवात स्वामींच्या नित्य उपासनेसोबतच सालाबादाप्रमाणे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने नगरप्रदक्षिणा, नित्य अनुष्ठान, धर्मसंकीर्तन, नित्य नामस्मरण दिनांक २५ एप्रिल ते ५ मे अखेर सकाळी ८ ते ११ या वेळेत विश्वस्त उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली गुरुलीलामृत ग्रंथाचे सामुदायिक पारायण, दिनांक २९ एप्रिल ते ६ मे अखेर अखंड नामवीणा सप्ताह, व दिनेश मावडीकर (पुणे) यांचे सकाळ संध्याकाळी सनई वादन तसेच दिनांक २४ एप्रिल ते ५ मे अखेर दुपारी १२ ते ४ या वेळेत स्थानिक व परगावच्या भजनी मंडळांची भजन सेवा दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत धर्मसंकीर्तन महोत्सव. या महोत्सवात दिनांक २४ एप्रिल रोजी ह.भ.प.भारत महाराज कुलकर्णी (साकतकर) वैराग यांची प्रवचन सेवा, तसेच ओंकार जाधव व सहकारी शाहीर रमेश हडपी कलामंच घाटकोपर मुंबई यांची भक्तीसंगीत सेवा, दिनांक २५ एप्रिल रोजी अयोध्यातील श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यातील गायन सेवा सादरकर्ते कु.भाग्यश्री आणि धनश्री वाटकर व सहकारी नागपूर यांची भक्तीसंगीत सेवा, दिनांक २६ एप्रिल रोजी कु.वैष्णवी पुजारी अक्कलकोट यांची नारदीय कीर्तनसेवा, दिनांक २७ एप्रिल रोजी रमेश वारंग प्रस्तुत ‘ही श्री स्वामींची इच्छा’ ही नाट्यसेवा, दिनांक २८ एप्रिल रोजी गायत्री क्षीरसागर व सहकार गुलबर्गा यांची भरतनाट्यम सेवा, दिनांक २९ एप्रिल रोजी माधुरी करंबेळकर व सहकारी पुणे यांची शास्त्रीय भक्तीसंगीत सेवा, दिनांक ३० एप्रिल रोजी ह.भ.प.सौ. सायली कुलकर्णी पुणे यांची नारदीय कीर्तन सेवा, दिनांक १ मे रोजी अभिषेक काळे व सहकलाकार सांगली यांची अभंगरंग सेवा, दिनांक २ मे रोजी मुकुंद बादरायणी चिंचवड पुणे यांची अभंगवाणी सेवा, दिनांक ३ मे रोजी ह.भ.प.समाधान महाराज कदम यांची हरीकिर्तन सेवा, दिनांक ४ मे रोजी सौ.रश्मी विचारे मुंबई नर्मदा परिक्रमा संवाद आधारित नर्मदा परिक्रमा एक जीवनानुभव चर्चा, संवाद व मुलाखत सेवा, दिनांक ५ मे रोजी
ह.भ.प.श्री.राजेंद्र आलोणे इचलकरंजी यांची प्रवचन सेवा इत्यादी धार्मिक कार्यक्रम संपन्न होतील. दि. ६ मे श्री स्वामी पुण्यतिथी रोजी पहाटे ३ वाजता नगरप्रदक्षिणा व नामस्मरण,
पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ६ वाजता नामवीणा सप्ताह समाप्ती सोहळा, सकाळी ७ वाजता देवस्थानचे स्वामींना अभिषेक, सकाळी ११ :३० वाजता मंदिर समितीचे, पुरोहितांचे व अक्कलकोट राजघराण्याचे स्वामींना महानैवेद्य आरती, दर्शन, दुपारी १२ ते ४ या वेळेत भाविकांना महाप्रसाद, सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत शहरातून पालखी सोहळा, दि. ७ मे रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत गोपाळकाला इत्यादी सर्व धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार संपन्न होणार आहेत. याप्रसंगी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी श्री स्वामी पुण्यतिथी महोत्सव म्हणजे तमाम स्वामी भक्त व अक्कलकोट वासियांच्या स्वामी भक्तीचा लोकोत्सव आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी श्रींचे नित्य दर्शन व धार्मिक कार्यक्रमांबरोबर श्रवण, मनन, चिंतन, दर्शन, प्रसाद, पालखी सोहळा इत्यादी श्रींच्या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.
