
सामाजिक बांधिलकी जपणारा समाजसेवेचा महामेरू गणेश हिरवे

सुभाष हांडे देशमुख
नेरूळ नवी मुंबई


गणेश हिरवे ! होय गणेश हिरवे. नावातच भगवंताचा वास असल्याने त्याला अनुसरूनच आचार, विचार आणि बुद्धीही त्याअनुषंगाने आली असे म्हटले तर गणेशच्या बाबतीत वावगे ठरु नये. त्यातच शिक्षकी पेशा स्वीकारल्यामुळे बुद्धीचा अधिक विकास होणे आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना व घडविलेल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजाला होणे आलेच. त्याचबरोबर तो विद्यार्थी अधिक सक्षम व प्रगल्भ होण्यास हातभार लागणे हे क्रमप्राप्तच. म्हणूनच गणेशच्या जीवनाचा आलेख सर्व अंगाने विकसित होत गेला आणि तो समाज हितैशी ठरला हे त्याने नुकतेच ५० वर्ष पूर्ण केलेल्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने आज अभिमानाने सांगावेसे वाटते.


खरे तर आपल्या बुद्धीला अनुसरून कारकीर्द स्वीकारणारी आणि निष्ठेने व एका ध्येयाने कार्यरत राहणारी गणेश सारखी माणसे आपला दैवी गुण सोडत नाहीत. ते कोणत्याही क्षेत्रात व स्तरावर असले तरी कोहिनूर जसा चमकतो तशीच ही माणसे चमकतात. गणेश त्यातीलच एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण. हे त्याने आपल्या आजपर्यंतच्या जीवन प्रवासातून सिद्धच केले आहे.
गणेश वसंत हिरवे मूळचा नारायणगाव आंबेगाव असा ग्रामीण भागाचा संस्कार घेऊन जोगेश्वरीत वाढलेला व शिक्षण पूर्ण केलेला. वडील शिक्षक, आई बालवाडी शिक्षिका, बहिण शिक्षिका, भाऊ मुंबई महानगरपालिकेत अधिकारी पदावर कार्यरत. अशाप्रकारे सुसंस्कृत घरातच गणेशचे बालपण गेल्याने चांगल्या संस्काराचे बाळकडू त्याला लहानपणापासूनच मिळत गेले. त्यामुळे बुद्धी बरोबरच संस्काराने तो प्रगल्भ होत गेला. शिक्षकी पेशा पत्करल्याने तो अधिक अधोरेखित झाला. म्हणूनच शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवताना पुस्तकी ज्ञाना बरोबरच मुलांचा सर्वांगीण विकास कसा घडून येईल यावर तो जाणिवपूर्वक लक्ष देतो.
प्रत्येक विद्यार्थ्याला विविध उपक्रमांद्वारे घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न तो करतो उपक्रमशील शिक्षक म्हणून त्याची ख्याती आहे.म्हणूनच शिक्षण संस्था आणि इतर अनेकांनी त्याचा वेळोवेळी प्रशस्तीपत्र, पुरस्कार देऊन यथोचित सन्मान केलेला आहे.
शिक्षकी पेशा सांभाळून त्याने अंगीकारलेले समाजसेवेचे व्रतही कौतुकास्पद असेच आहे. जॉय ऑफ गिव्हींग या समाजसेवी संस्थेची स्थापना करुन तिच्या माध्यमातून आदिवासी आश्रमशाळा, आदिवासी पाडे, शिक्षणापासून वंचित शालेय विद्यार्थी, वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना मदत, कोविड काळातील त्याचे उल्लेखनीय काम (जवळपास पाच हजार कुटुंबांना किराणा किट वाटप आणि आजही त्याचे किराणा वाटप सुरूच आहे.) अशा प्रकारे विविध स्तरावर त्याचे नोकरी सांभाळून सुरू असलेले काम नकीच अभिमानास्पद आहे.
गणेश ला सौ. योगिता ही सुविद्य पत्नीही शिक्षकी पेशातीलच मिळाली आहे. हे ही त्याचे भाग्यच. कारण प्रेमळ सहचरणी आणि मुलांची यथायोग्य काळजी घेऊन कुटुंब व्यवस्थित सांभाळणारी आणि गणेशला ही सामाजिक कामात प्रेरणा देणारी, प्रोत्साहन देणारी असा तिचा स्वभाव असल्याने त्याला सुलभपणे काम करण्यास आनंद व समाधान मिळते हे ही तितकेच खर आहे.
असं म्हटलं जातं की चांगलं काम करणारा माणूस कधीच सन्मान मागत नाही. त्याचे कार्य त्याला सन्माना स पात्र बनवते. गणेशच्या बाबतीतही असंच काहीसं झालं आहे. तो करीत असलेल्या चांगल्या कामासाठी वेळोवेळी अनेकजण त्याचा गौरव करीत असतात.आतपर्यंत त्याने ३५ वेळा रक्तदान, १७ वेळा प्लेटलेट्स डोनट आणि स्वखर्चाने तेरा हजारांहून अधिक पुस्तक वाटलेली आहेत.त्याच्या कामाची दाखल घेऊन अनेक पुरस्कार त्याला मिळतात.आता पर्यंत वैयक्तिकरित्या त्याला १२६ पुरस्कार तर त्याच्या जॉय संस्थेचा देखील अनेकांनी पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे.. गणेश च्या उज्वल भविष्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा !