गावगाथाठळक बातम्या

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाला हक्काची इमारत कधी मिळणार ? ; सध्याच्या कार्यालयाला इतकं आहे भाडे… पाहा सविस्तर

निगडी (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना होऊन जवळपास सहा वर्षे झाली आहेत. दरम्यान पोलीस आयुक्त कार्यालय महापालिकेच्या इमारतीत अद्याप भाडेतत्त्वावर आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या इमारतीसाठी पालिकेला दरमहा तीन लाख 80 हजार 727 रुपये इमारत भाडे द्यावे लागत असून पोलीस आयुक्तालयाला हक्काची इमारत आवश्यक आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण मधून विभाजन होऊन पिंपरी चिंचवड शहरासाठी 15 ऑगस्ट 2018 रोजी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. मूलभूत संसाधनांसाठी आयुक्तालयाला सुरुवातीपासून झगडावे लागले. पोलीस आयुक्तालय पोलीस मुख्यालय यासाठी स्वतःची जागा, अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थाने यासाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता होती. मागील दोन वर्षांमध्ये अधिकारी कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी तसेच पोलीस आयुक्त कार्यालयासाठी जागेची मंजुरी मिळाली आहे. तर मुख्यालयाच्या जागेसाठी अजूनही शोध सुरू आहे.

आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्लस्टर येथील इमारती मधून आयुक्तालयाचा कारभार सुरू झाला. त्यानंतर प्रेमलोक पार्क चिंचवड येथील महात्मा फुले इंग्लिश मीडियम स्कूल या इमारतीमध्ये पोलीस आयुक्तालयाचे स्थलांतर झाले. त्यानंतर ही इमारत महापालिकेकडून पोलिसांना भाडेतत्त्वावर देण्यात आली. या इमारतीसाठी पोलीस विभाग दरमहा 3 लाख 80 हजार 727 रुपये मोजत आहे. ही माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे.

मागील दोन वर्षांमध्ये महत्त्वाच्या दोन जागा पोलीस आयुक्तालयाला मिळाल्या आहेत. काळेवाडी फाटा येथे पीएमआरडीएची जागा आहे. त्यातील 15 एकर जागा पोलीस आयुक्त कार्यालयासाठी मिळाली आहे. या जागेत पोलीस आयुक्त कार्यालय, सह पोलीस आयुक्त कार्यालय, अपर पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस उपायुक्त (गुन्हे) कार्यालय, पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) कार्यालय, नियंत्रण कक्ष, एमओबी-पीसीबी कार्यालय, तांत्रिक विश्लेषण विभाग, आर्थिक गुन्हे शाखा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, विशेष शाखा, पासपोर्ट विभाग, चारित्र्य पडताळणी विभाग, लिपिक आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय असणार आहे.

तसेच मोशी येथे असलेल्या 16 एकर जागेपैकी आठ एकर जागा पिंपरी-चिंचवड आरटीओला देण्यात आली आहे. तर उर्वरित आठ एकर जागा पिंपरी-चिंचवड पोलिसांना देण्यात आली आहे.

त्या जागेत पिंपरी-चिंचवड पोलीस सायबर पोलीस ठाणे उभारण्यात येणार आहे. तसेच उपनिरीक्षक ते सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने, शहराला आणखी एक अपर पोलीस आयुक्त हे पद मंजूर झाले आहे. त्यांचे कार्यालय देखील येथे होणार आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त कार्यालय देखील मोशी येतील जागेत होणार आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांना जागा मिळाली असून आता त्या जागेमध्ये इमारत तयार होणे आवश्यक आहे. स्वतःची इमारत नसल्याने पोलिसांना महापालिकेला लाखो रुपये भाड्यापोटी द्यावे लागत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button