एसटी चा 76 वा वर्धापन दिन मंगळवेढा बसस्थानकावर उत्साहात साजरा.
1 जून, 1948 ला पुणे-अहमदनगर मार्गावर एसटीची पहिली बस धावली. त्या निमित्ताने दरवर्षी 1 जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो

एसटी चा 76 वा वर्धापन दिन मंगळवेढा बसस्थानकावर उत्साहात साजरा.

1 जून, 1948 ला पुणे-अहमदनगर मार्गावर एसटीची पहिली बस धावली. त्या निमित्ताने दरवर्षी 1 जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. दि.1 जून 2024 रोजी मंगळवेढा बसस्थानकावर एसटी चा 76 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंगळवेढा बसस्थानक स्वच्छ धुवून, सडा मारुन एसटी चे प्रतिक चिन्हाची भव्य रांगोळी काढण्यात आली होती. बसस्थानकावरील खांबास झेंडुची फुले, केळी व नारळाच्या फांद्या बांधून सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक संजय भोसले हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मा.डॉ.श्री.चरण कोल्हे (मुख्याधिकारी, न.प.मंगळवेढा), मा.श्री.योगेश कदम (गटविकास अधिकारी,पं.स.मंगळवेढा) हे होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री.जयदीप रत्नपारखी (संचालक मे.गजानन रत्नपारखी ज्वेलर्स,मंगळवेढा), पत्रकार प्रशांत मोरे, औदुंबर ढावरे तसेच मंगळवेढा आगाराचे पालक अधिकारी श्री.परशुराम नकाते विभागीय वाहतूक अधिक्षक,रा.प.सोलापूर हे उपस्थित होते. सुरुवातीस मान्यवरांचे, प्रवाशांचे तसेच कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते केक कापून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर आगाराच्या वतीने मान्यवर व्यक्तींचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा आगाराच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सन 2024 मध्ये 10 तसेच 12 परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या रा.प.कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा देखील प्रमाणपत्र व पुष देऊन सन्मान करण्यात आला. तसेच मंगळवेढा आगार व बसस्थानकाची स्वच्छता ठेवणाऱ्या स्वच्छता दूतांचा देखील पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे ज्येष्ठ प्रवाशी बांधव, माजी रा.प.कर्मचारी यांचादेखील या कार्यक्रमानिमित्त सन्मान करण्यात आला. प्रवाशी बंधु-भगिनींना साखर-पेढे वाटप करुन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमास स्थानक प्रमुख शरद वाघमारे, सहायक कार्यशाळा अधीक्षक विठ्ठल भोसले, लेखाकार योगेश कांबळे, वाहतूक निरीक्षक योगेश गवळी, प्रमुख कारागीर तुकाराम माने, वाहतूक नियंत्रक दत्तात्रय रायबान, संतोष चव्हाण, गणेश गवळी, अमोल शिनगारे, वरिष्ठ लिपिक परमेश्वर भालेकर, उमेश ननवरे, वेदिका सुर्यवंशी, प्रियंका मोरे, तसेच सर्व कामगार संघटनांचे पदाधिकारी, चालक,वाहक, यांत्रिकी कर्मचारी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन अमोल काळे यांनी तर आभार धनाजी पाटील यांनी मानले.

