Mumbai: वृक्षारोपणाने पर्यावरण दिन नेरूळ जेष्ठ नागरिक संघातर्फे उत्साहात साजरा

नवी मुंबई, (प्रतिनिधी – सुभाष हांडे देशमुख): नेरुळ येथील जेष्ठ नागरिक संघ नेरुळ, रुग्णसेवा केंद्र, नेरुळ जेष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालय, ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था, एसकॉम व फेसकॉम यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जून रोजी आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन नेरूळ वसाहतीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. पर्यावरणाची समाजामध्ये जनजागृती अधिक वृद्धिगत करण्यासाठी ज्येष्ठांनी प्रभात फेरी काढली. नेरुळ येथील सेक्टर १९ मधील विरंगुळा केंद्रापासून निघालेली ही प्रभात फेरी, नेरूळ रेल्वे स्टेशन पासून पुढे शनि मंदिराच्या शेजारील लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल उद्यानामध्ये जमा झाली. या नियोजित ठिकाणी सर्व ज्येष्ठांनी व मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केला. याप्रसंगी सर्वश्री अण्णासाहेब टेकाळे त्याचप्रमाणे अरविंद वाळवेकर व विकास साठे, डॉक्टर तानाजी डफळ, अंकुश जांभळे, भालचंद्र माने, अजय माढेकर, सीमा आगवणे यांनी पर्यावरण विषयक समयोचित भाषणे केली. नंदलाल बॅनर्जी यांनी झाडाचा वेश करून रॅली मध्ये रंगत आणली. ज्येष्ठांनी रॅलीमध्ये पर्यावरण विषयक स्लोगन लिहिलेले बोर्ड हातात धरून लोकांचे लक्ष आकर्षित केले. जल है तो कल है, वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे, झाडे लावा झाडे जगवा इत्यादी वृक्षारोपण संवर्धनाबाबत ज्येष्ठांनी केलेला प्रभात फेरीतील गजर अधिक लक्षवेधक ठरला.

या वृक्षारोपण उपक्रमात मा. नगरसेविका सौ. मीरा पाटील यांचे मोलाचे सक्रिय सहकार्य लाभले. पोलीस विभातील अधिकाऱ्यांनी देखील या वृक्षारोपणात आपला सहभाग नोंदवला. दत्ताराम आंब्रे यांनी उत्कृष्ट छायाचित्रण करुन पर्यावरण दिन संस्मरणीय केला. रणजीत दीक्षित व सुनील आचरेकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाची आखणी उत्कृष्टपणे केली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
